खा. उदयनराजेंच्या हॅटट्रीकसाठी राष्ट्रवादी सरसावली

सातारा, दि. 7 (प्रतिनिधी)- साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच चर्चेत येवू लागले आहे. खा. उदयनराजेंच्या हॅटट्रीकसाठी राष्ट्रवादी सरसावली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. असे असले तरी जनतेवर छाप पाडण्यासाठी सांगता सभाही महत्वाची असते. त्याअनुषंगाने नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते गुंतले असून विविध परवाने व मैदाने निश्‍चितीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
सातारा लोकसभेसाठी रणांगण तापू लागले आहे. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने त्याच दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व महायुतीचे नरेंद्र पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे आता लवकरच वरिष्ठ नेतेमंडळींच्या जाहीर सभा होणार असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. त्यातून राजकीय जुगलबंदी पहायला मिळणार आहे.
नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा दि. 21 रोजी होणार आहे. नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन सभा देवू केल्या आहेत. त्यांच्या सभा कोरेगाव आणि वाई येथे होणार आहेत. त्यांच्यासोबत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हेही आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ना. महादेव जानकर, ना. चंद्रकांत पाटील, केंद्रीय समाजकल्याण मंत्री यांच्याही सभा होणार आहेत. सभेच्या तारखा अजुनही निश्‍चित झाल्या नसल्या तरीही सांगता सभेची तारीख महायुतीची अंतिम झाली आहे.जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. 21 रोजी सकाळी 9 वाजता तर दुपारी 2 वाजता कराड येथे होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही उदयनराजे यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांना आणण्याची जोरदार तयारी सुरु आहे. दि. 20 रोजी सायंकाळी किंवा दि. 21 रोजी दुपारी जिल्हा परिषद मैदानावर सभा होण्याची शक्‍यता आहे. यावेळी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहे. राज ठाकरे यांची एक सभा सातारा मतदारसंघात होणार आहे. त्यांची सभा पाटणला होण्याची शक्‍यता असून यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी कराड दक्षिण आणि कराड उत्तरचेही कार्यकर्ते हजेरी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्याही सभेचे नियोजन सुरु आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी स्टार प्रचारकरांच्या सभांचे आयोजन करण्यामध्ये व त्यांच्या तारखा मिळवण्यामध्ये दोन्ही बाजूकडून प्रयत्न सुरु आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.