खासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण

निवडणूक सोपी जावी म्हणून हवेलीकडे दुर्लक्ष करीत बारामती मतदार संघात पदांची खिरापत

लोणी काळभोर: लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक खासदार सुप्रिया सुळे यांना सोपी जावी, याकरिता हवेली पंचायत समितीचे उपसभापतीपद त्यांच्या मतदारसंघातील पंचायत समिती सदस्याला देण्यात आले. मात्र, अशा खुळ्या राजकीय खेळीमुळे मागील निवडणुकी सारखाच मोठा फटका शिरुर-लोकसभा व शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात पक्षाला बसण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघ सोडून जिल्ह्यातील इतर मतदारसंघाचा विचार राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार नाही, तोपर्यंत अजित पवार किंवा सुप्रिया सुळे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. शरद पवार यांच्या कन्या असूनही सुप्रिया सुळे या निवडून याव्यात म्हणून प्रत्येकवेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना झुकते माप देण्याचा खुळ्याप्रमाणे विचार केला जात असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांत पक्ष रसातळाला चालला आहे.

हवेली पंचायत समितीमध्ये सुरवातीपासून कॉंग्रेस व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. हवेली पंचायत समितीची निवडणूक झाली, त्यावेळी एकूण 26 सदस्य निवडून आले होते. या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला 13 जागा, भारतीय जनता पक्षाला 6 जागा, शिवसेनेला 5 जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. पहिल्या वर्षी सभापती म्हणून सोरतापवाडी गणातून निवडून आलेल्या वैशाली महाडिक यांना सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून मांजरी गणातून निवडून आलेले अजिंक्‍य घुले यांना संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत अपक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ दिल्याने पक्षाला हवेली पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले. या मदतीबद्दल त्यावेळी अपक्षांना सत्तेत ठराविक वाटा देण्याचे आश्वासन पक्षाच्या बहुतेक सर्व नेत्यांनी दिले होते.

सव्वा वर्षानंतर सभापती पदी हेमलता काळोखे यांना संधी मिळाली. तुटफूट होण्याच्या शक्‍यतेने उपसभापती पदाची निवडणूक तब्बल अडीच महिने पुढे ढकलण्यात आली होती. दि. 27 ऑगस्टला उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. या दिवशी सकाळी 09:30 पर्यंत शिरुर विधानसभा मतदारसंघातील एका पंचायत समिती सदस्याचे नाव उपसभापती पदासाठी चर्चेत होते. मात्र, 09:45ला फोन आला व एका क्षणात सुरवातीचे नाव मागे पडून सुप्रिया सुळे यांच्या सोयीच्या राजकारणासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील पंचायत समिती सदस्याला उपसभापती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे महापालिकेची हद्द वाढल्यामुळे 26 सदस्य असलेल्या हवेली पंचायत समितीचे पाच सदस्य कमी झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक सदस्य कमी झाला आहे. आता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 11, भाजपचे 4, शिवसेनेचे 4 व 2 सदस्य अपक्ष असे एकूण 21 सदस्य सध्या पंचायत समितीमध्ये आहेत.

हवेली पंचायत समितीचे सध्या सभापती पद भुषवणाऱ्या हेमलता काळोखे यांचे गाव मावळ लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. तर, नुकतेच उपसभापती पदी निवड झालेल्या सचिन घुले यांचे गाव बारामती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. आणखी एक विशेष म्हणजे उपसभापतींच्या गावाचा समावेश पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत करण्यात आला आहे. उपसभापतींच्या गटातील जिल्हा परिषद सदस्या सुरेखा चौरे या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांना मिळणाऱ्या निधीपेक्षा कितीतरी पट जास्त निधी समाजकल्याण सभापतींना मिळतो. बारामती लोकसभा मतदारसंघातील एकाच जिल्हा परिषद गटातील सदस्यांना समाजकल्याण सभापती व पंचायत समिती उपसभापती पद देण्यामागे आगामी लोकसभा निवडणूक सोपी जावी हाच एकमेव हेतू आहे. मात्र, त्यामुळे शिरुर लोकसभा व शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात पक्षाचे पानिपत होत आहे. या गोष्टींकडे राष्ट्रवादीचा कायम कानाडोळा होत आला आहे.

हवेली-शिरूरचा विचार करणे गरजेचे?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फक्त बारामती लोकसभा व बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सोपी कशी होईल या दृष्टीनेच विचार करतो, हे वेळोवेळी अधोरेखित झाले. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा विचार करणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिरुर लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार गेल्या तीन निवडणुकीत का पराभूत होतो? हवेली-शिरुर विधानसभा मतदारसंघात 2009 ते 2014 या काळात कोट्यवधींची विकासकामे करुनही 2014 मध्ये निवडणुकीत अशोक पवार यांना का पराभव स्वीकारावा लागला. या गोष्टींचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधी विचार केलेला नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)