खासदार नव्हे; केंद्रात मंत्री निवडून द्यायचाय!

आदेश बांदेकर ः चाकणमध्ये आढळराव यांच्या प्रचारार्थ महिलामेळावा

चाकण-यंदाची लोकसभेची निवडणूक अतिशय वेगळी आहे. या निवडणुकीत तुम्हाला फक्त खासदार निवडून द्यायचा नाही तर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रुपाने केंद्रात मंत्री निवडून द्यायचा आहे. तुम्हाला नरेन्द्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचे आहे, असे आवाहन होम मिनिस्टर फेम व शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते. या मेळाव्याला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. खासदार आढळराव पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असले तरी चॅनलवर लोकप्रिय असलेल्या होम मिनिस्टर प्रमाणेच आपल्या नेहमीच्या शैलीत प्रश्‍नोत्तराचा खेळ रंगवीत कार्यक्रम रंगवला. कधी महिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत, तर कधी त्यांना प्रश्‍न विचारत या कार्यक्रमाला बांदेकरांनी मनोरंजक स्वरुप दिले होते.

खेळीमेळीच्या वातावरणात अचानक ते मोदींचे हात बळकट करण्यासाठी खासदार आढळराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करीत होते. तर तुमच्याकडे कोणती जादू आहे या महिलांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी आपल्याकडे शिवसेनेची जादू आहे, भगव्याची जादू आहे असे सांगितले. नोकरी-व्यवसाय सांभाळून आपल्या घरात स्थैर्य निर्माण करणाऱ्या महिलांना येत्या काळात आपल्या देशात स्थैर्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. देशाचे नेतृत्त्व कुणाच्या हाती सोपवायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे. मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचाराला चांगलाच आळा घातला आहे.

यावेळी कल्पनाताई आढळराव पाटील, मनिषाताई सुरेश गोरे, शिवसेनेच्या महिला सहसंपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, राजगुरुनगरच्या माजी नगराध्यक्षा सारिका घुमटकर, तालुकाप्रमुख नंदा कड, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रुपाली परदेशी, संगिता जगताप, रेखा क्षोत्रिय, चाकणच्या नगरसेविका मंगल गोरे, श्रीमती शेख तसेच शिवसेना-भाजपच्या शहरप्रमुख, विभागप्रमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष ऍड. प्रकाश गोरे, राजेंद्र गोरे, प्रवीण गोरे, नगरसेवक धीरज मुटके हेही उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.