खासदारांनी काढले पोलिसांचे वाभाडे

राजगुरुनगर- भोसरी ते चाकण दरम्यान जवळपास सहा आसनी रिक्षा व जीप, कार अशी 1200 वाहने बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करतात. वाहनचालक चौक अडवून रस्त्यावरच आपली वाहने पार्क करतात, परिणामी रस्ता अडवला जाऊन वाहतूक ठप्प होते. विशेष म्हणजे हे सर्व चौकातील वाहतूक पोलिसांच्या समक्ष होत असताना ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तसेच बेकायदाप्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनचालकांना कोणाचे पाठबळ आहे? अशा स्पष्ट शब्दांत खासदार आढळराव पाटील यांनी पोलिसांचे वाभाडे काढले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण, राजगुरुनगर, नारायणगावसह जिल्ह्यातील सर्वच महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक बुधवारी (दि. 29) बोलावली होती, त्यावेळी खासदार आढळराव पोलिसांच्या कामावर संतप्त झाले होते. या बैठकीला पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, वाघोली या ठिकाणी वाहतूककोंडीचा प्रश्‍न अतिशय गंभीर झाला असल्याकडे लक्ष वेधून अतिक्रमणे आणि अवैध वाहतूक करणारी वाहने यांच्यावर कारवाई करा. चाकण, राजगुरुनगर, मंचर नारायणगाव या शहरातील चौकात पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. याबाबत पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पुणे-नाशिक रस्त्यावर राजगुरुनगर शहर आणि खेड घाटातव पुढे मंचर, नारायणगाव येथे मोठे-मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळेही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना हे खड्डे भरून तत्काळ रस्ते दुरुस्त करण्यास सांगितले. त्यानुसार प्राधिकरणाने खडे भरण्याचे काम आजपासून सुरू केले असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक झगडे यांनी दिली. त्याचबरोबर राजगुरुनगर व चाकण नगरपरिषद आणि दोन्ही पोलीस ठाण्यांना पत्र देऊन या दोन्ही ठिकाणची चौकातील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली आहे. त्याबाबत गांभीर्याने पाऊले उचलण्याची सूचनाही खासदार आढळराव पाटील यांनी केली. तसेच सद्यस्थितीत तातडीची बाब म्हणून चाकण ते मोशी दरम्यानच्या वाहतूक नियंत्रणासाठी किमान 20-22 पोलीस उपलब्ध करून देण्याची सूचना पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक पोलीस उपायुक्‍तांनी केली.

  • प्रत्येक ठाण्यात 50 पोलीस उपलब्ध करणार
    नगरपरिषद व मोठ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यासाठी मागणी येताच तत्काळ पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महामार्गावरील प्रत्येक पोलीस ठाण्याला 50 पोलीस उपलब्ध करून दिले जातील. याबरोबरच स्वयंसेवी संस्था अथवा नागरिकांनी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, परस्पर वाहतूक नियंत्रण करू नये. नागरिकांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर 9604303333 या आपल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
  • राजगुरुनगर येथील वाहतूक नियंत्रणासाठी नगरपरिषदेने 15 वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यात 900 नवीन होमगार्डची भरती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण पूर्ण होताच चाकण नगरपरिषदेसह मोठ्या ग्रामपंचायतींनाही ट्राफिक वॉर्डन देण्यात येतील.
    – संदीप पाटील, पोलीस अधीक्षक
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)