खासगी शाळांमध्ये 25 टक्‍के प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी अखेर

पुढील शैक्षणिक वर्षासाठी खासगी प्राथमिक शाळांचे वेळापत्रक लवकरच जाहीर

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षक हक्‍क अधिनियमानुसार (आर.टी.ई.) दुर्बल व वंचित घटकातील बालकांना सन 2019-20 या शैक्षिणिक वर्षासाठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये 25 टक्‍के प्रवेश देण्याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया फेब्रुवारी अखेरीस सुरू होणार आहे.
राज्यात 1 एप्रिल, 2010 पासून आरटीई कायदा अंमलात आला. पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असलेल्या घटकांतील मुलांना या कायद्यांतर्गत खासगी विना अनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये किमान 25 टक्‍के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. 15 मार्च, 2013 च्या शासनाच्या अधिसूचनेनुसार या प्रवेशाबद्दलचे नियम आणि त्याबाबतची कार्यवाही जाहीर करण्यात आली. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचे निश्‍चित धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यासाठी राज्यातील 8 हजार, 976 शाळा पात्र ठरविण्यात आल्या होत्या. यातील प्रवेश क्षमता 1 लाख, 26 हजार, 119 एवढी अपेक्षित धरण्यात आली होती. प्रवेशासाठी एकूण 1 लाख, 99 हजार, 59 ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. यातील 1 लाख, 14 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 74 हजार, 308 एवढ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सुमारे 39 हजार, 782 प्रवेशाच्या जागा रिक्‍त राहिल्या होत्या.

चालू शैक्षणिक वर्षासाठी पुणे जिल्ह्यात आरटीईच्या प्रवेशासाठी 930 शाळा होत्या. यात 16 हजार, 293 एवढ्या जागा होत्या. यासाठी 43 हजार, 583 ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. यातील 19 हजार, 106 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. यातील केवळ 12 हजार, 100 विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले आहे.

प्रवेशासाठी “आरटीई’ पोर्टलवर वेळापत्रक, शाळांची यादी, मदत केंद्र, आवश्‍यक असणारी कागदपत्रे, प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शिका याची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी रहिवासी किंवा वास्तव्य, जात, दिव्यांग, जन्म, वार्षिक उत्पन्न याबाबतचे सर्व दाखले काढून तयारीत ठेवणे आवश्‍यक आहे.

आता प्रवेशासाठी जागा वाढतील
आगामी शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या “आरटीई’ पोर्टलद्वारेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीला शाळांच्या नोंदणीचे काम सुरू असून त्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. आता प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रत्यक्षात ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)