खालुंब्रे भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प

लवकरच कार्यान्वित होणार : 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रतिदिन प्रक्रियेची क्षमता

महाळुंगे इंगळे- उद्योग पंढरीचे नाक असलेल्या खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार असून, त्या उभारणी कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

याप्रसंगी चाकण परिसरातील नागरिक, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, कंपन्याचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रतीदिन 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता येथील प्रकल्पाची असणार आहे. चाकण औद्योगिक वसाहत क्षेत्रातील बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे जाणाऱ्या रस्त्या लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. मागील अनेक वर्षे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागेची मागणी करण्यात येत होती. मात्र, जागेची उपलब्धता न झाल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. कारखानदारांची संघटना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने वेळोवेळी कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागेची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील साडेसात एकर जागा हस्तांतरित केली आहे.

चाकण, तळेगाव दाभाडे, तळवडे औद्योगिक क्षेत्रातील अघातक घनकचरा गोळा करणे, वाहतूक करणे व प्रक्रिया करण्यासाठी चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक दोनमध्ये साडेसात एकर जागेत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार आहे. दरम्यान, चाकण नगरपरिषदेला याच प्रकल्पात समाविष्ट करून घेण्याची या भागातील नागरिकांची मागणी आहे. चाकण नगरपरिषद प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रही दिले आहे.

  • चाकण एमआयडीसी फेज 2 मधील ह्युंदाई लगतच्या ए – 22 व ए – 24 येथील साडेसात एकर जागेत हा प्रकल्प सुरु होणार आहे. येथे प्रतीदिन 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणार आहे. 24 तासांमध्ये 15 मेट्रिक टन कचऱ्याचे सीएनजी व खतात रुपांतर होणार आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प हरित प्रकल्प असणार आहे. त्याचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही.
    – दिलीप बटवाल, सचिव,. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज,.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.