खालुंब्रेतील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

कारचालकाची प्रकृती चिंताजनक : इर्टिगा कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तीन दुचाक्‍यांना धडकली

महाळुंगे इंगळे- इर्टिगा कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तीन दुचाक्‍यांना धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन दुचाकीवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शिंदे वासुली चौक ते एचपी चौक या रस्त्यावरील खालुंब्रे (ता. खेड ) गावच्या हद्दीतील केएसएच लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊन समोर मंगळवारी (दि. 30 एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास झाला. या अपघातात कारसह दुचाकीचा चक्‍काचूर झाला आहे. मृतांमध्ये भोसरीतील दोघे व चिखली येथील तिघे अशा एकूण पाच जणांचा समावेश आहे. तर चाकण पोलीस ठाण्यात कारचालकावर बुधवारी (दि. 1) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रशेखर सुरजलाल विश्‍वकर्मा (वय 38, सध्या रा. भोसरी, ता. हवेली), सुनील परमानंद शर्मा (वय 43, सध्या रा. भोसरी, मूळ रा. हरियाणा), दीपनारायण हरिवंश विश्‍वकर्मा (वय 24), सत्यवान पांडे (वय 45) व सर्वज्ञ संजय विश्‍वकर्मा (वय 35, तिघे रा. चिखली, ता. हवेली) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर सुहास शिवकरी (रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) असे गंभीर जखमी असलेल्या कारचालकाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णाल्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रमोद रामकृष्ण कठोरे (वय 47, रा. चाकण, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुहास शिवेकारी हा मंगळवारी (दि. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास इर्टिगा (एमएच 14, जीएन 3768) कारने खालुंब्रे गावच्या हद्दीतील एचपी चौकातून शिंदे-वासुली गावाकडे निघाला होता. त्यावेळी त्याची गाडी खालुंब्रे गावच्या हद्दीतील केएसएच लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊन समोर आली असता त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटी होवून घसरत गेली. त्यावेळी समोरून भरधाव येत असलेल्या मोटारसायकल (एमएच14 डीएल 7964), (एमएच 14 डीई 2942), (एमएच 14, एजे 5149) या तीन दुचाकींवर जोराने धडकली असता या तिनही दुचाकींवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील, सहायक उपायुक्‍त चंद्रकांत अलसटवार व चाकण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे व त्यांचे अन्य सहकारी पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.