खळदला रंगला कुस्त्यांचा आखाडा

खळद- पुरंदर तालुक्‍यातील खळद येथे धुलवडीच्या सणानिमित्त कुस्त्यांचा आखाडा पार पडला. येथे वर्षांतून दोन वेळा कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो. एक गावच्या वार्षिक यात्रेला व धुलवडीच्या दिवशी आयोजित कुस्त्यांचा आखाडा हा येथील स्थानिक मुलांचाच असतो. येथे पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी धुलवडीच्या सणानिमित्ताने सकाळपासूनच लहान मुलांचा जल्लोष पहावयास मिळाला. यावेळी लहान मुलांनी गावातील होळीभोवती महिलांनी टाकलेल्या पाण्यातून तयार झालेला चिखल एकमेकांच्या अंगावरती टाकून धुलवड खेळत याचा आनंद घेतला.

सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने परिसरात पाण्याची कमतरता भासत आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत होळीभोवती हंड्याने पाणी ओतणाऱ्या महिला आता कुठेतरी तांब्याभर पाणी टाकतात व ही परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पूर्वीच्या होळीचा रंग सध्या अनुभवायला मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.