खरिप हंगामाच्या आढाव्याची प्रतिक्षा

– रामचंद्र सोनवणे

जून महिना अर्ध्यावर येऊनही खेड तालुक्‍याचा खरीप हंगामाचा आढावा झाला नाही. लोकसभा निवडणुका, त्यातच पडलेल्या भयावह दुष्काळ आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या या कचाट्यात सापडल्याने यावेळी तालुक्‍याचा खरीप हंगाम नियोजन बैठक झाली नसल्याने शेतकरी चिंतातूर बनले आहेत. एकीकडे दुष्काळ त्यात खते, बी-बियाणे यांचे नियोजन या खरीप हंगाम बैठकीत होत असते; मात्र यावेळी ते न झाल्याने त्यातच ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातील कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने नियोजन कसे करायचं? हा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

खेड तालुक्‍यात 1972 नंतर पहिल्यांदा मोठा दुष्काळ पडला आहे. तालुक्‍यात पहिल्यांदाच चारा छावणी सुरु करावी लागली. तर अनेक गावे वाड्यावस्त्या तहानलेल्या आहेत असे असताना खरिपाचा हंगाम सुरु झाला आहे. मागील वर्षी 20 मे 2018 रोजी खरीप हंगाम बैठक झाली होती; यावर्षी मात्र अद्यापहीही नियोजन बैठक झालीच नाही. खरीप हंगाम बैठकीत खते, बी-बियाणे, त्यावरील अनुदान, शेतकरी विमा योजना, शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी आदी विषय या खरीप हंगामाच्या बैठकीत घेतले जातात. शेतकऱ्यांना बांधावर खते, बी-बियाणे यावर्षी मिळणार का नाही, अनुदानावर बियाणे खरेदी करता येणार का नाही, हवामान अंदाज, घेण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन, जलयुक्त शिवार, तालुक्‍यातील धरणातील पाण्याचे नियोजन, कालवा गळती आदी चर्चा या खरीप हंगाम नियोजन बैठकीत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षांसह, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पातळीवरील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध जिल्हा व तालुक्‍याचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहतात.

गेली अनेक वर्षांपासून तालुका पातळीवर खरीप हंगामापूर्वी अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी यांची साधारणतः मे महिन्यात खरीप हंगाम नियोजन बैठक घेतली जाते. त्यात सर्व नियोजन केले जाते कृषी खात्याकडून शासकीय अनुदानातून खते, बी बियाणे याचे वाटप केले जाते. पेरणीचा हंगाम दुष्काळामुळे लांबला असला तरी आता मोसमी पाऊस दोन-तीन दिवसांत दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन विस्कटले आहे. बी-बियाणाची उपलब्धता, भेसळ, खते त्यावरील अनुदान याबाबत शेतकरी अनभिज्ञ असून, त्यांचे हेलपाटे सुरु झाले आहेत.

अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. शासकीय नियोजनाभावी यावेळी शेतकरी बेभरवशी शेती करणार का? विविध पिकांचे नियोजन कसे करणार, कृषी अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार असल्याने यंदाचे खरीप हंगाम नियोजन बिघडले आहे. मोसमी पावसाने मारलेली दांडी, दुष्काळाचे सावट, त्यातून कसे सावरायचे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.