खबदार प्लॅस्टीक पिशवी वापरल्यास 5 हजारांचा दंड

राजगुरूनगर- शहरात प्लॅस्टिकबंदी निर्णय आज (रविवार) पासून अंमलात आणण्यात आला असून प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करून 5 हजार रुपयांपासून पुढे दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा, यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून 5 हजार 500 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले, असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.
राजगुरुनगर शहरात प्लॅस्टिकबंदी शासनाच्या निर्णयानुसार लागु करण्यात आली होती, त्यावर उपाययोजना म्हणून शहरात राहणाऱ्या महिलांकडून त्यांच्या वापरातील जुन्या साड्या घेवून त्या साड्यांच्या आकर्षक पिशव्या शहरातील बचत गटाच्या माध्यमातून तयार केल्या आहेत. जवळपास दीड लाख कापडी पिशव्या टप्प्याटप्प्याने शहरातील नागरिकांना दैनंदिन वापरासाठी देण्यात येणार आहेत. यातून शहरात प्लॅस्टिकबंदी आणि बचत गटात काम करणाऱ्या महिलांना रोजगाराची संधी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिली आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जुन्या साड्यापासून बनविण्यात आलेल्या पिशव्यांचे वाटप आज नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगरसेविका सारिका घुमटकर, रेखा क्षोत्रीय, संपदा सांडभोर, नंदा जाधव, स्नेहलता गुंडाळ, मनोहर सांडभोर, निलेश घुमटकर, सुभाष जैद, प्रवीण संघवी यांच्यासह कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने येथे भाजी बाजारात आलेले नागरिक उपस्थित होते.
राजगुरुनगर शहरातील नागरिकांचे आरोग्य जोपासण्यासाठी प्लॅस्टिकमुक्त शहर हा अभिनव उपक्रम सुरु आहे. या उपक्रमात नगरसेवक शहरातील नागरिक आणि महिला बचतगट यांचा मोठा सहभाग मिळाला आहे. यासाठी नगरपरिषदेच्यावतीने जनजागृती करण्यात आली होती. दि 18 फेब्रुवारी रोजी शहरातील महिलांकडून जुन्या साड्या स्विकारण्यास सुरुवात झाली होती. घरोघरी पिकअप गाडी पाठवून त्यात महिलांच्या वापरत नसलेल्या जुन्या साड्या गोळा करण्यात आल्या होत्या. दोन महिन्यात नगरपरिषदेकडे मोठ्या प्रमाणात साड्या गोळा झाल्या होत्या. शहरातील बचत गटांच्या महिलांकडून कापडी पिशव्या शिवण्यात आल्या होत्या. या बदल्यात त्यांना प्रती पिशवी तीन रुपये असा मोबदला देण्यात येत आहे. यामुळे बचतगटातील महिलांना रोजगार मिळाला आहे.

  • स्वच्छ सर्वेक्षण महाराष्ट्र 2018 या उपक्रमांतर्गत राजगुरुनगर शहरात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय झाला आहे. साडेपाच हजार कापडी पिशव्या नगरपरिषदेच्या वतीने वाटप करण्यात आल्या आहेत. शहरात प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी नगरपरिषदेची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे तसेच प्लॅस्टिक पिशव्या वापरू नयेत.
    -शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)