खडकाळ जमिनीतून मिळवले पाच लाखांचे उत्पादन

35 गुंठे जमिनीत घेतले कलिंगडाचे अंतर पीक

पारगाव शिंगवे- कांदा, बटाटा या पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळले असून पिकांचे योग्य नियोजन, पिके घेण्याची कल्पकता, बाजारभाव या बाबींचा विचार केल्यास शेतात पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन चांगला नफा मिळवता येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आंबेगाव तालुक्‍यातील भराडी येथील शेतकरी बाळासाहेब देवराम खिलारी यांनी 35 गुंठे खडकाळ व मुरमाड शेतजमिनीत कलिंगाडाचे अंतर पीक व झेंडूच्या फुलांची बाग फुलून या दोन पिकातून अडीच महिन्यात पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे.

अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत ऊस, कांदा ,बटाटा, कोबी, टोमॅटो या पिकांचे उत्पादन घेतात. यामुळे पिकांना दर वेळेस समाधानकारक बाजारभाव मिळतील असे नसते. त्यामुळे या पिकांऐवजी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडधान्ये, फळाच्या बागा, फुलशेती आदी पिके घेतल्यास चांगले उत्पादन घेऊन भरघोस नफा मिळविता येतो.

बाळासाहेब खिलारी यांनी 35 गुठ्ठे खडकाळ व मुरमाड शेतजमिनीत कलिंगड व झेंडूची फुलांचे अंतरपिक घेण्याचे ठरविले. शेतजमीन नांगरून त्यामध्ये शेणखत टाकून सरी काढून वाफे तयार केले. अगोदर कलिंगडाची लागवड आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी झेंडूच्या रोपांची लागवड करण्यात आली. खडकाळ शेतजमीन असल्याने ही पिके घेण्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करण्याचे ठरविले.

  • कलिंगड व झेंडू पिकांची योग्य प्रकारे काळजी घेऊन औषधे तसेच रसायनिक खतांचा योग्य वापर केला. तसेच पाण्याचे नियोजन केल्याने या पिकांची चांगली वाढ झाली. कलिंगड पिकातून 2 लाख रुपये नफा मिळाला. तसेच झेंडूच्या फुलांची चांगली वाढ झाली व झेंडूला प्रति किलोस 60 ते 70 रुपये बाजारभाव मिळत गेल्याने या पिकातून 3 लाख 50 हजार रुपये नफा मिळाला. कलिंगड आणि झेंडूच्या फुलांच्या अंतर पिकांसाठी ठिंबक सिंचन, रोपे, खते, औषधे व मजुरी असा एकून 50 हजार रुपये खर्च करण्यात आला. हा सर्व खर्च जाऊन 5 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला.
    बाळासाहेब खिलारी, शेतकरी 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.