कालवा फुटीप्रकरण : … तर रोखता आली असती दुर्घटना

पालिका, जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष : तीन तास आधीच दुर्घटना रोखणे होते शक्‍य

पुणे : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडकवासला कालवा फुटीचे खापर उंदीर आणि घुशीवर फोडले असले तरी, या घटनेची कुणकुण महापालिकेस सकाळी साडेआठ वाजताच लागली होती. तसेच, साडेदहा वाजताच ही माहिती जलसंपदा विभागास तसेच पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासही देण्यात आली होती. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याने ही घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सकाळी साडेआठ वाजताच कालवा बंद केला असता तर ही घटनाच घडली नसती, त्यानंतरही साडेदहा वाजता कालव्याची सुमारे 1 फूट भींत खचल्यानंतरही कालवा तातडीने बंद करणे शक्‍य होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही दुर्घटना प्रशासकीय समन्वय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती दाखविली असती तर, तीन तास आधीच योग्य त्या उपाययोजना करून रोखणे शक्‍य झाले असल्याचे समोर आले आहे.

सकाळी ८:३०
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेळ सकाळी 8.30
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजताच ज्या ठिकाणी कालवा फुटला त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे नागरिकांनी तातडीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळविली, त्यानंतर पालिकेचे कर्मचारी तातडीने घटना स्थळी पोहोचले. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी माहिती जलसंपदा विभागाला कळविली. मात्र केवळ भेट देऊ असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा 10.30 वाजता पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुन्हा कल्पना देण्यात आली. त्यानंतर काही अधिकारी घटना स्थळाकडे निघाले होते मात्र, तोपर्यंत सकाळी 11.15 वाजता भिंतीचा भराव खचला आणि सर्वत्र हाहाकार झाला.

सकाळी १०:१०

सकाळी 10:30 वाजता
गळती होण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर कालवा फुटणार याची जाणीव पालिकेच्या अधिकाऱ्यांना झाली होती. त्यामुळे तातडीनं पावले उचलत ही माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना कळविण्यात आली. मात्र, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने हातात काही वेळ असतानाही काहीच केले नाही. परिणामी त्याची किंमत दांडेकर पूल वसाहतीमध्ये राहणाऱ्या 700 कुटुंबांना मोजावी लागली.

सकाळी ११:१५

सकाळी 11.15 ते 20 मिनिटं
जवळपास तीनतास आधी पासूनच गळती वाढली असल्याने महापालिकेकडून वारंवार जलसंपदा विभागास कळविले जात होते.मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय काहीच निर्णय घेण्यास जलसंपदा विभागाचे अधिकारी तयार नव्हते. जेव्हा 11.15 वाजता कालवा फुटल्याने जलसंपदा विभाग तातडीनं घटनास्थळी निघाले. तसेच कालवा बंद करण्याचे आदेश दिले.

कालवा बंद करण्यासाठी पाऊण तास
कालवा फुटल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाचे धाबे दणाणले त्यामुळे त्याच्याकडून तातडीनं कालव्याचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे दरवाजे स्वयंचलित असले तरी, घटनेच्या दिवशी गुरुवार असल्याने वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे दरवाजे बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मदत घेऊन ते हाताने ऑपरेट करून बंद करण्यात आले. त्यासाठी जवळपास पाऊण तास लागला, त्यामुळे कालवा फुटल्यानंतर पाऊण तास आधी हा बंद झाला असता तरी झालेली हानी काही प्रमाणात कमी झाली असती.

दुपारी 12.05 यंत्रणा जागी झाली
महापालिकेने 2013-14 मध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार घटना घडल्यानंतर पुढील 15 मिनिटं आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचेल असे व्यवस्थापन आहे. मात्र, घटनेच्या दिवशी कोणतीही तयारी नव्हती. पावसाळ्यात शहरात मुठा नदीचे पाणी घुसत असल्याने राज्य शासनाने महापालिकेस तसेच जिल्हा प्रशासनास संयुक्त आपत्ती व्यवस्थापन समिती नेमली आहे. या समितीचे कामकाज वेगाने व्हावे यासाठी आपत्ती व्यवस्थापण विभागाचा व्हॉटस अॅप ग्रुप आहे. त्यात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार आणि जलसंपदा विभाग, पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास काही सेकंदाच्या आता माहिती सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जाते. असे असताना या घटनेची माहिती या ग्रुपवर 12 वाजून 5 मिनिटांनी पडली. मात्र, त्यावर ग्रुपमध्ये केवळ कोणाला कोणी फोन करायचा याची चर्चा सुरू होती. त्यात केवळ अग्निशमनदल मदतीसाठी उपस्थित होते. मात्र, पावसाळ्यासाठी क्षेत्रीय कार्यालयावर उभारलेली कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे पहिला तासभर केवळ पोलीस आणि अग्निशमन कर्मचारीच होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाची पालिका अथवा जिल्हा प्रशासनाची कोणतेही यंत्रणा नव्हती.

व्हीएमडीचा वापरच नाही
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिकेचा तब्बल 125 कोटी रुपये खर्चून स्मार्ट एलिमेंट उभारली आहेत. त्यात तब्बल 150 व्हीएमडी उभारल्या असून अशा दुर्घटना घडल्यास तातडीनं शहरात अथवा संबंधीत भागात अलर्ट देण्यासाठी डिजिटल स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्यावर एकाचवेळी शहराला वाहतूक अथवा इतर सूचना देण्यासाठी साऊंड यंत्रणा बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यासाठीचे केंद्र ज्या ठिकाणी दुर्घटना झाली त्या ठिकाणहुन अवघ्या 1 किलोमीटरवर आहे. त्यामुळे घटना घडल्यानंतर या भागातील बंद करण्यात आलेली वाहतूक तसेच आसपासच्या भागातील नागरिकाना सूचना देणे शक्‍य होते. या घटनेनंतर स्मार्ट सिटीनेही या यंत्रणेचा वापर करावा म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागास कळविण्यातही आले होते. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्याकडेही दुर्लक्ष केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)