खडकवासला कालवा प्रकरण : नागरिकांच्या प्रतिक्रिया

मी पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीसह या ठिकाणी राहातो. कपडे शिवण्याचा व्यवसाय असल्याने सकाळीच घराबाहेर पडलो होतो. घरात अडीच वर्षांची मुलगी आणि पत्नी होती. पाणी घुसताच ते घाबरून गेले. मात्र, घरात अनेक साहित्य असल्याने तसेच सगळेच पाण्यात वाहून जाण्याच्या भीतीने त्यांनी घर सोडंल नाही. नंतर पाणी वाढत असल्याचे पाहून त्यांना स्थानिक नागरिकांनी घराबाहेर काढलं. मात्र, घरातील सगळा संसार वाहून गेला आहे. आता खाण्यासाठीचीही भ्रांत आहे.
– अर्षद अन्सारी


मी ड्रायव्हरचे काम करतो. दर गुरुवारी मला सुट्टी असते. मात्र, आज अचानक मला काम आल्याने घरातून बाहेर जावे लागले. घरी माझा 16 वर्षांचा मुलगा होता. मात्र, अचानक पाणी घुसल्याने घरातील साहित्य वाचविण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. मात्र, पाणी वाढल्याने त्याला घरातून बाहेर पडावे लागले. या घटनेची माहिती मला माझ्या जवळच राहणाऱ्या मेहूनीकडून मिळाली. त्यानंतर आहे तसा घरी आलो; तर सगळं घर वाहून गेलं होत. त्यामुळे आता पुन्हा सुरुवातीपासून कसं उभारायचा हा प्रश्‍न असला तरी मुलाला काही झालं नाही ही समाधानाची बाब आहे.
– भाऊसाहेब जगदाळे


गणेशोत्सवानिमित्त माझी बहीण 5 वर्षांच्या मुलीला माझ्याकडे घेऊन आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी असल्याने घरात झोपून होती. सकाळी बहिणी बरोबर स्वयंपाक करत असताना, अचानक वस्तीमध्ये पाणी शिरले. घर उंचीवर असल्याने पाणी येणार नाही, असे वाटत होते. मात्र, पाणी जवळपास आमच्या कमरेपर्यंत आले. त्यामुळे आम्ही घाबरून गेलो होतो. त्याचवेळी या भागातील तरुणांनी आजारी मुलीसह, मला आणि बहिणीला पत्र्यावरून बाहेर काढून सुरक्षीत स्थळी हलविले.
– उषा वानखेडे


गेल्या चाळीस वर्षांपासून माझा चपल, शुज विकण्याचा व्यवसाय आहे. सकाळी अचानक जोरात पाणी आल्याने दुकानातील बहूतांश माल वाहून गेला. चपलाच्या दुकानावरच कुटुंब अवलंबून असल्याने मोठे नुकसान झाले आहे. सर्व दुकानात पाणी गेल्याने दुकानातील काही साहित्यही खराब झाले आहे. आता काय करायचे हा मोठा प्रश्‍न असून महापालिकेनेच आता काहीतरी मदत करावी ही अपेक्षा आहे.
– तुळशीराम कांबळे, दुकानदार


सव्वाअकराच्या सुमारास घरामध्ये काम करत होते. उतारालाच घर असल्याने वेगाने पाणी आत आले. काही मिनीटातच घरात सर्वत्र पाणी झाले. घरातील बरेचशे सामान वाहून गेले असून बाहेर पडणेही मुश्‍किल झाले. यानंतर काही मुलांनी दोरीच्या सहायाने घरातूनत बाहेर काढण्यास मदत केल्याने वाचले.
– कविता शिंदे


सकाळी नातीला शाळेत नेवून सोडले. यानंतर अकराच्या सुमारास तिला पुन्हा आणायला गेले. नातीला घेऊन परत आले तेव्हा सगळ्या घरात पाणी शिरले होते. यामुळे घरात येणेही शक्‍य झाले नाही. यात घरातील सगळे सामान भीजून गेले असून काही सामान वाहून गेले आहे.
– लक्ष्मी ढेरे (वय 65)


नेहमीप्रमाणे सकाळी नऱ्हे येथे कामासाठी गेलो. कामावर गेल्यानंतर काही वेळातच कालवा फुटल्याची माहिती फोनवरून समजली. घरी कुणी नसल्याने मी लगेच कामावरून परत आलो. मात्र, तोपर्यंत घरातील फ्रिज, टी.व्ही साहित्य संपूर्ण भिजले होते. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
– निलेश मोहोळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)