खटाव मिनी विधानसभा कोण जिंकणार ?

निवडणुका जाहीर झाल्याने मोर्चेबांधणीला वेग

प्रकाश राजेघाटगे
बुध, दि. 9 – खटाव-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील खटाव ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम झाल्यापासून सर्व राजकीय गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीत प्रदीप अण्णांची 20 वर्षांची सत्ता अबाधित राहते की नवीन नेतृत्व राहुल पाटील व भाजपचे महेश शिंदे यांचे पॅनेल बाजी मारणार? याकडे खटावसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
खटाव ग्रामपंचायतीची निवडणूकही विधानसभेची रंगीत तालीमच असल्याने व पहिल्यांदाच थेट सरपंच असल्याने निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांचे 20 वर्षांपासून ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व अबाधित आहे.
विकासकामे व निष्ठावंत कार्यकत्याची मजबूत फळी हे प्रदीप अण्णांच्या विजयाचे गमक आहे. प्रदीप आण्णांना पक्षश्रेष्ठींपासून आ. शशिकांत शिंदे यांचे मोठे पाठबळ मिळत आहे. गेल्या 20 वर्षात विरोधकांना चारीमुंड्या चीत केले असले तरी सत्तेची हवा कधीच डोक्‍यात जाऊ न दिल्यामुळे त्यांच्या ताकतीची आजपर्यंत कुणालाही थांगपत्ता लागला नाही.
खटावचे माजी आमदार कै. चंद्रहारदादा यांचे नातू व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणारे नवीन नेतृत्व राहुल पाटील यांना जुना दादा गटाचा व तरुण युवकांचा पाठींबा आहे. राहुल पाटील यांची राजकीय इनिंग या निवडणुकीमुळे होत असून यात त्यांची कामगिरी कशी होणार? यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. दरम्यान. कोरेगाव मतदारसंघात कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करुन विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांनी राहुल पाटील यांना बरोबर घेत खटाव ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांच्या दृष्टीने ही विधानसभेची रंगीत तालीमच आहे. सर्वांना बरोबर घेऊन 20 वर्षाच्या प्रदीप आण्णांच्या सत्तेला सुरंग लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहत.
शिवसेनेच्या वतीने अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमीन आगा हे रिंगणात उतरले आहेत. पण शिवसेनेची निवडणूक पहिल्यांदाच असल्यामुळे त्यांचा किती प्रभाव पडेल हे काळच ठरवेल. निवडणूकीच्या रणधुमाळीत अनेक नेत्यांचा कस लागत आहे.
खटाव ग्रामपंचायतीचा गड सर कोण करणार? याकडे खटावसह सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. खटावमधील सुज्ञ मतदार आपल्या मतदानातूनच तो कौल देणार असल्याने पंचवीस फेबुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. खरी लढत प्रदीप अण्णा विरुद्ध महेश शिंदे व राहुल पाटील यांच्यात दुरंगी होणार असल्यामुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×