खटाव ग्रामपंचायतीसाठी चुरशीने 83.28 टक्के मतदान

खटाव, दि. 24 (प्रतिनिधी) – गेला महिनाभर गाजत असलेल्या खटाव ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज चूरशीने मतदान झाले. खटाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी एकूण 83.28% एवढे विक्रमी मतदान झाले. एकूण 7968 मतदारांपैकी 6636 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विक्रमी संख्येने झालेल्या मतदानामुळे मतदार राजाचा कौल काय असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
खटाव ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण 18 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. यावर्षी थेट सरपंच जनतेतून निवडला जाणार असल्याने मोठी चुरस आहे. खटाव येथील श्रीलक्ष्मी नारायण स्कूलमध्ये वार्ड क्रमांक चार, पाच व सहासाठी तीन बुथवर मतदान प्रक्रीया राबवली गेली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्ड क्रमांक एक, दोन व तीनसाठी मतदान घेण्यात आले. वार्ड क्रमांक एकसाठी 857 वार्ड दोनसाठी 957 वार्ड तीनसाठी 1078 वार्ड चारसाठी 1387 वार्ड पाचसाठी 1242 वार्ड सहासाठी 1115 मतदान झाले. एकूण 6636 मतदारांनी मतदान केले.
सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. यावेळी चुरशीने मतदान झाले. तरुणाईबरोबरच वृद्धांनीही मतदान केले. एक वयोवृद्ध मतदार तर चक्क सलाईनच्या बाटलीसह मतदानासाठी आले होते. यावेळी पुसेगाव पोलिस स्टेशनचे सपोनि विश्वजीत घोडके व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज वडूज येथे मतमोजणी होणार आहे. या निकालाकडे खटाव तालूक्‍यातीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे मोठ्या उत्सुकतेने लक्ष लागून राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.