क्रीडा समितीच्या नवर्निवाचितांचे खडे बोल

पिंपरी – नव्याने सभापतीपदाचा पदभार स्विकारलेल्या सभापतींनी महापालिकेच्या वतीने केवळ क्रीडाच नव्हे, तर कला, साहित्य आणि सांस्कृतिक या सर्व विषयांशी संबंधित प्रस्ताव आता क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसमोर मान्यतेसाठी सादर करावेत, असा आदेश नवनियुक्त सभापती संजय नेवाळे यांनी प्रशासनाला दिला. केवळ क्रीडा विभागापुरतेच या समितीचे कार्य मर्यादित ठेवू नका, असे खडेबोल देखील अधिकाऱ्यांना सुनावले.

महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती मधील सभापती व सदस्यांचे नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर संजय नेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.25) या समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हे आदेश देण्यात आले. या बैठकीला सदस्या सुजाता पालांडे, अनुराधा गोफणे, अपर्णा डोके व अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन-अडीच वर्षांपुर्वी महापालिकेने क्रीडा विभागाला कला, साहित्य आणि सांस्कृतिक हे विभाग देखील जोडून, संबंधित विषयांचे निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले. तत्पूर्वी महापालिका प्रशासनानाने क्रीडा व सांस्कृतिक धोरणही ठरविले आहे. यापैकी 2014 मध्ये स्विकालेल्या क्रीडा धोरणांतर्गत महापौर चषक स्पर्धा व अन्य मैदानी खेळ व दत्तक खेळाडू योजना यांसारखे उपक्रम राबविले जातात. तर सांस्कृतिक धोरणांतर्गत पुणे महापालिका राबवित असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आथिक योगदान देत, काही चित्रपट शहरातील चित्रपटगृहांमध्ये दाखविले जातात.

दरम्यान, या समितीच्या मान्यतेकरिता केवळ क्रीडा विषयाशी संबंधित प्रस्ताव मांडले जात असून, सांस्कृतिक धोरणांतर्गत असलेले कार्यक्रम विद्युत विभागचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले जातात. मात्र. या विषयाचा खर्च व अनुषंगिक बाबींचे प्रस्ताव या समितीसमोर येत नसल्याने अगोदरच दुय्यम दर्जा असलेल्या या समितीच्या निर्णयाची फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे ही समिती खऱ्या अर्थाने दुर्लक्षित राहिली आहे.
या सर्व बाबींमुळे अनेकदा या समितीच्या बैठका तहकूब कराव्या लागल्या आहेत. मात्र, लाखो रुपये खर्च होत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रस्ताव देखील या समितीपुढे सादर करुन, या समितीची मान्यात घेणे आवश्‍यक असल्याचे मत या समितीचे सभापती संजय नेवाळे व अन्य सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता पुढील काळात क्रीडाबरोबरच कला, साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांशी संबंधित प्रस्ताव या समितीच्या मान्यतेकरिता आणले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मैदाने, जलतरण तलाव, तसेच विविध क्रीडा स्पर्धा याशिवाय सांस्कृतिक, कला व साहित्य या बाबींवर खर्च करण्यासाठी समितीला 21 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद योग्य प्रकारे खर्च होऊन, शहराचा कला, साहित्य, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक व्हावा, यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रयत्नशील आहोत.
– संजय नेवाळे, सभापती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)