क्रीडाक्षेत्राबद्दल युवकांच्या उदासीनतेबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनाही चिंता 

युवकांच्या सहभागाच्या दहा वर्षांपूर्वीच्या आकडेवारीत तब्बल 8 टक्‍क्‍यांनी घट 
वॉशिंग्टन – भारताची लोकसंख्या सुमारे 135 कोटींच्या घरात असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना मिळणारी पदके नगण्यच म्हणावी लागतील. परंतु देशातील फारच कमी बालके आणि युवक क्रीडाक्षेत्रात सहभागी होतात हे त्याचे मूळ कारण आहे. इतकेच नव्हे तर विविध कारणांमुळे क्रीडाक्षेत्राकडे वळणाऱ्या भारतीय युवकांची संख्या दिवसेंदिवस कमीच होत आहे. मात्र हा केवळ भारतासारख्या विकसनशील देशाच्या चिंतेचा विषय नसून या समस्येने अमेरिकेलाही ग्रासले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अमेरिकेतील युवकांचे क्रीडाक्षेत्रात सहभागी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चिंता व्यक्‍त केली आहे. किंबहुना 10 वर्षांपूर्वी क्रीडाक्षेत्रात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांची संख्या सुमारे 45 टक्‍के इतकी होती, ती आता घटून जेमतेम 38 टक्‍क्‍यांवर आली असल्याबद्दल ट्रम्प यांनी गंभीर चिंता व्यक्‍त केली.

मुख्य म्हणजे निम्न आर्थिक स्तरावरील कुटुंबांमध्ये हे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे पाहून ट्रम्प यांनी भविष्यातील धोका आणखीनच वाढणार असल्याचे अचूक ताडले. क्रीडाक्षेत्राकडे पाठ फिरविण्याचा हा ट्रेन्ड आपण बदललात पाहिजे आणि आम्ही ही परिस्थिती बदलून दाखवू, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या स्पोर्टस, फिटनेस आणि न्यूट्रिशन काऊन्सिलला आरोग्य व मनुष्यबळ सचिवाशी समन्वय राखून याविषयी तातडीने पावले उचलण्याचे आदेश मी दिले आहेत. “व्हाईट हाऊस स्पोर्टस अँड फिटनेस डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी याबाबतीत सोशल मीडियाचा वापर करण्याचीही कल्पना मांडली. ट्रम्ट यांचे सोशल मीडियावर 10 कोटी फॉलोअर्स असल्याचा दावा केला जातो. सोशल मीडियाचा वापर करून या संदर्भात जागरूकता निर्माण करता येईल, असा विश्‍वास ट्रम्प यांनी व्यक्‍त केला आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेत क्रीडापटूंना उत्तम सुविधा आणि शासनाचे पाठबळ मिळत असूनही युवावर्ग क्रीडाक्षेत्राकडे पाठ फिरवीत असणे अधिक गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यानंतर टॅम्प यांनी गोल्फ खेळून क्रीडादिनाचे उद्‌घाटन केले. या वेळी ट्रम्प यांची लाडकी कन्या इव्हान्का, प्रख्यात फुटबॉलपटू हर्शेल वॉकर, अत्यंत लोकप्रिय बीच व्हॉलीबॉल खेळाडू मिस्टी मे ट्रीनर, आंतरराष्ट्रीय गोल्फपटू नताली गल्बिस आणि मरियानो रिव्हेरा यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. इव्हान्कानेही रग्बी व फुटबॉलचे धडे गिरविले.
क्रीडाक्षेत्रामुळे लाभते शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती क्रीडाक्षेत्रातील सहभाग युवावर्गाच्या व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा असतो, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, वैयक्‍तिक आणि सामाजिक जीवनातील सहभाग, आरोग्यपूर्ण जीवन, तंदुरुस्त राहण्यासाठी चांगल्या सवयी, शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक नागरिक तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेले अनुशासन, योग्य आहारविहाराच्या सवयी हे सारे क्रीडाक्षेत्रातील सहभागामुळे शक्‍य होऊ शकते. जीवनातील अतिशय मौल्यवान धडे क्रीडांगणावरच शिकायला मिळतात, असे सांगून ते म्हणाले की, अडचणींवर मात करणे, पराभव पचवून पुढे जाणे, विजयानंतरही संयम राखणे, तसेच सातत्याने शिकत राहणे हे गुण क्रीडांगणावरच विकतसित होत असतात. खिलाडूवृत्तीने पराभव मान्य करून प्रतिस्पर्ध्यांनाही मित्र बनविणे हे अस्सल खेळाडूलाच शक्‍य असते. ऍथलेटिक्‍स, गोल्फ, टेनिस, जिम्नॅस्टिक्‍स किंवा बॅडमिंटनच्या कोर्टवर शिकायला मिळालेले धडे आयुष्यभर उपयोगी पडतात. मी स्वत: संपूर्ण आयुष्यभर क्रीडाक्षेत्राचा चाहता आहे आणि माझ्या आवडत्या व्यक्‍तींमध्ये क्रीडापटू सर्वाधिक आहेत. त्यामुळेच मी आता युवावर्गाला मोठ्या प्रमाणात क्रीडाक्षेत्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)