#क्रीडांगण: मॅग्निफिशंट मेरी-मेरी कोम

योगिता जगदाळे

पाच वेळा जागतिक अजिंक्‍यपद मिळवलेल्या भारताच्या अव्वल बॉक्‍सर मेरी कोमने पोलंडमधील ग्लीवाईस येथे झालेल्या सिलेसियान खुल्या बॉक्‍सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावला आहे. 48 किलो वजनगटात मेरी कोमने कजाकिस्तानच्या आईगेरीम कसानायेव्हा हिचा पराभव करून या वर्षातील तिसरे सुवर्णपदक मिळवले. मेरी कोमने आईगेरीम कसानायेव्हाचा 5-0 असा सरळ पराभव केला. या सुवर्णपदकामागेही मेरी कोमच्या अचाट जिद्दीची कहाणी आहे, 48 किलो गटातील सामन्यापूर्वी मेरी कोमचे वजन 48 किलोपेक्षा सुमारे दोन किलो अधिक होते, साडेतीन वाजता ती पोलंडमध्ये पोहोचली होती आणि साडेसात वाजता अधिकृत वजन व्हायचे होते. तिच्या हाती चार तास होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जास्त वजनामुळे ती स्पर्धेतून बाद होण्याचा धोका होता. पण मेरी कोमने सतत चार तास दोरीवरच्या उड्या मारून आपले वजन दोन किलो कमी केले आणि त्या स्पर्धेत आपले या वर्षीचे तिसरे सुवर्णपदक जिंकले. री मॅग्निफिशंट या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या मेरी कोमची कारकीर्द दृष्ट लागावी अशी आहे. आजकाल महिला सबलीकरणाच्या घोषणात मेरी कॉम ही महिला सबलीकरणाचे चालते बोलते उदाहरण आहे.

मांगते चुंगनेजंग मेरी कोम असे लक्षात ठेवण्यास कठीण नाव असलेली मेरी कोम ही मणिपूरची आहे. मणिपूरमधील इम्फाळची रहिवासी आहे. साधारणपणे मणिपूर म्हटले की आपल्याला मणिपुरी नृत्याची आठवण येते. पण मेरी कोमला नृत्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला नाचवण्यात आणि जोरदार ठोसे लगावत पराभूत करण्याची अधिक आवड आहे. तिने मिळवलेली पाच जागतिक अजिंक्‍यपदे याचीच द्योतक आहेत. जगातील सर्वच्या सर्व सहा जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धांमध्ये पदके जिंकणारी मेरी कोम ही एकमेव बॉक्‍सर आहे.

मणिपूरमधील कांगथीए नावाच्या एका दुर्गम खेड्यात 1 मार्च 1981 रोजी एका गरीब कुटुंबात मेरी कोमच जन्म झाला. मेरीच्या घरची परिस्थिती अशी होती, की मुलांना शिक्षण देणे ही तिच्या पालकांना कठीण होते. तिचे प्राथमिक शिक्षण मोईरंग येथे, तर पदवीपर्यंतचे शिक्षण सेंट झेवियर कॉलेजमधून झाले.

मेरी कोम बॉक्‍सिंगकडे वळली ती मणिपुरी बॉक्‍सर डिंको सिंग यांच्यामुळे, बॅंकॉक एशियायी स्पर्धेत या मणिपुरी बॉक्‍सरने सुवर्णपदक जिंकले. ते पाहून मेरी कोमलाही बॉक्‍सिंगच्या रिंगणात उतरावेसे वाटले. घरचा विरोध असूनही मेरी कोम बॉक्‍सिंगकडे वळली. नुसती वळलीच नाही, तर तिने बॉक्‍सिंगमध्ये देदीप्यमान कामगिरी केली. वयाच्या 17 व्या वर्षी, सन 2000 मध्ये तिने पहिले राज्यस्तरीय पदक जिंकले, तेही केवळ दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर. वृत्तपत्रात आलेले तिचे फोटो आणि नाव पाहून घरच्यांना तिच्या यशाची कल्पना आली. त्यानंतर तिने पदके जिंकण्याचा सपाटाच लावला. पुढील पाच वर्षे तिने सर्व राष्ट्रीय स्पर्धांवर आपली मोहर उमटवली. हिस्सार येथे झालेल्या दुसऱ्या एशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पहिले सुवर्णपदक जिंकले. तैवानमध्ये त्याची पुनरावृत्ती केली.

अमेरिकेत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिला रजतपदकावर समाधान मानावे लागले असले, तरी नंतर नॉर्वे, रशिया आणि भारतात झालेल्या जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण यश मिळवले. सन 2005 साली मेरी कोमचा फुटबॉलपटू के ऑन्लॉन कोम यांच्याशी विवाह झाल. त्यानंतर ती काही काळ बॉक्‍सिंगपासून दूर राहिली. जुळ्या मुलांची माता बनल्यानंतर तिने पुन्हा बॉक्‍सिंगच्या रिंगणात पाऊल टाकले. त्यानंतर तिच्या करिअरचा दुसरा टप्पा सुरू झाला, तो ही सुवर्णपदकाने.

मेरी कोमला पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संजय लीला भन्साळीने मेरी कोमच्या जीवनावर चित्रपट निर्माण केला होता, त्यात मेरी कोमची भूमिक साकारली होती प्रियंका चोप्राने. 35 वर्षाची आणि दोन मुलांची माता असलेली मेरी कोम अजूनही पूर्ण भरात असून तिचा स्टॅमिना जबरदस्त आहे. प्रतिस्पर्ध्याला रिंगणात जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करायची हे तिचे तंत्र आहे. तिच्या खाती आणखी किती सुवर्णपदके जमा होतात हेच पाहायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)