#क्रीडांगण : फ्रान्सचा बोलबाला 

अमित डोंगरे 

जागतिक फुटबॉल क्षेत्रात सर्वांत प्रतिष्ठतेची समजली जाणारी वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा नुकतीच रशियात अविस्मरणीय वातावरणात पार पडली. फ्रान्स संघाने या स्पर्धेत एकही सामना न गमावता आपलाच बोलबाला सिद्ध करत विजेतेपद मिळवले. 

क्रोएशियाचा संघ या स्पर्धेत अगदीच नवखा होता; मात्र त्याने बलाढ्य संघांना पराभूत करत आश्‍चर्यकारकरीत्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. विजेतेपदाची संधी त्यांना निश्‍चितच होती; मात्र फ्रान्ससमोर त्यांचा अनुभव तोकडा पडला.
एकही सामना न गमावता अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील लढतीनंतर अखेर फ्रान्सने आपण जागतिक फुटबॉलचे ‘सम्राट’ असल्याचे सिद्ध केले. अवघ्या फुटबॉलविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळविला आणि झळाळत्या सोनेरी वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी 1998 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या फ्रान्सला 20 वर्षांनी ही सुवर्णसंधी साधता आली. सर्वाधिक शॉट्‌स, चेंडूवरील सर्वाधिक ताबा, पूर्वार्धात सामन्याची सारी सूत्रे हातात असणाऱ्या क्रोएशियावर अखेरीस फ्रान्सने बाजी मारली. फ्रान्सने अचूक पासेस आणि भक्‍कम बचावाच्या बळावर विश्‍वविजेतेपदाचे स्वप्न पूर्ण केले. रशियात प्रथमच भरत असलेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेते जर्मनी, माजी विजेते अर्जेटिना, स्पेन, इंग्लंड असे एकापेक्षा एक सरस संघ बाहेर फेकले गेल्यानंतर, वर्ल्ड कप युरोपात जाणार हे स्पष्ट झाले होते. अखेरीस फ्रान्सनेच वर्ल्ड कपमध्ये बाजी मारली.
फ्रान्सने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ग्रिझमन, पॉल पोम्बा आणि किलियन एम्बापे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम लढतीत क्रोएशियावर 4-2 ने मात केली आणि दुसऱ्यांदा जगज्जेतेपद पटकावले.

जागतिक क्रमवारीत फ्रान्स सातव्या, तर क्रोएशिया 20व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ पाच वेळा आमनेसामने आले होते. त्यात तीन वेळा फ्रान्सने बाजी मारली होती, तर दोन लढती ड्रॉ झाल्या होत्या. त्यातही 1998च्या वर्ल्ड कपमध्ये हे संघ उपांत्य लढतीत आमनेसामने आले होते. त्यात फ्रान्सने बाजी मारली होती. ‘त्या’ पराभवाचे उट्टे काढून क्रोएशिया जेतेपद मिळविणार की, फ्रान्स दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावणार, याकडे तमाम फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. तिसऱ्या मिनिटाला क्रोएशियाच्या इव्हान पेरीसिचने सुरेख चाल रचली होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. त्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंनी सातत्याने चाली रचत फ्रान्सच्या बचाव फळीवर दडपण ठेवले. मात्र नंतर 17व्या मिनिटाला ग्रिझमनला रोखण्याचा प्रयत्न क्रोएशियाला महागात पडला.

ब्रोझोविचने ग्रिझमनला पाडल्याने, रेफ्रींनी फ्रान्सला फ्री किक दिली. ग्रिझमनने मारलेला चेंडू परतविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मांझुकिचच्या डोक्‍याला लागून चेंडू थेट गोलपोस्टमध्ये गेला आणि फ्रान्सच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. वर्ल्ड कपच्या फायनलमधील हा पहिलाच स्वयंगोल ठरला आणि या वर्ल्ड कपमधील बारावा स्वयंगोल ठरला. त्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. 22व्या मिनिटाला व्हिडाने हेडरद्वारे गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू गोलपोस्टवरून गेला. 27 व्या मिनिटाला कांतने पेरीसिचला पाडले. कांतेला रेफ्रींनी यलो कार्ड दिले आणि क्रोएशियाला फ्री किक मिळाली. मॉड्रीचने मारलेल्या या फ्री किकनंतर क्रोएशियाला संधी मिळाली. या संधीचे पेरीसिचने सोने केले. 28व्या मिनिटाला त्याने जबरदस्त गोल नोंदवीत क्रोएशियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर आघाडी मिळविण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. 37व्या मिनिटाला गोल पोस्ट जवळ पेरीसिचच्या हाताला चेंडू लागला आणि फ्रान्सला ‘पेनल्टी’ बहाल करण्यात आली. या संधीचे ग्रिझमनने सोने केले. त्याने क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिचला चकवून गोल नोंदविला आणि फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्या वेळी फ्रान्सच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मध्यंतरापर्यंत फ्रान्सने आघाडी कायम राखली.

आतापर्यंत ज्या-ज्या सामन्यात ग्रिझमनने गोल नोंदविला, त्यात फ्रान्स संघ हरला नव्हता, तर दुसरीकडे गेल्या तीनही सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर क्रोएशियाने बाजी मारली होती. या वेळीही तशाच कामगिरीची पुनरावृत्ती क्रोएशिया करणार का, याबाबत औत्सुक्‍य वाढले होते. उत्तरार्धात काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. 47 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या खेळाडूंनी सुरेख चाल रचली होती. अति रेबिचने जबरदस्त प्रयत्न केला होता. मात्र, तितक्‍याच चपळाईने फ्रान्सचा गोलरक्षक लॉरीसने रेबिचचा प्रयत्न हाणून पाडला. 51 व्या मिनिटाला फ्रान्सच्या किलियान एम्बापेने जबरदस्त प्रयत्न केला होता. मात्र, क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिचने एम्बापेचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर काही प्रेक्षक मैदानात आल्याने, क्षणभर खेळ थांबविण्यात आला होता. 59 व्या मिनिटाला एम्बापे, ग्रिझमन यांनी सुरेख चाल रचली आणि पॉल पोग्बाने गोल नोंदवून फ्रान्सला3-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्या वेळी फ्रान्सच्या खेळाडू आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर सहाच मिनिटांनी एम्बापेने गोल नोंदवून फ्रान्सला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्या वेळी तर फ्रान्सच्या खेळाडू आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावारा राहिला नव्हता. त्यानंतर, 69व्या मिनिटाला फ्रान्सचा गोलरक्षक लॉरीसकडून चूक झाली आणि माझुंकिचने गोल नोंदवीत क्रोएशियाच्या आशा पल्लवीत केल्या. त्यानंतर क्रोएशियाने प्रयत्न केले. मात्र, फ्रान्सने 4-2 अशी आघाडी कायम राखत विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)