क्रिकेट स्पर्धा: पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपदाचा मान 

पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक क्रिकेट स्पर्धा 
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना संघाने अंतिम सामन्यात व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा 25 धावांनी पराभव करताना पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा पीवायसी क्‍लबच्या मैदानावर पार पडली. 
अंतिम फेरीच्या लढतीत सिद्धेश वीर याने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 45 षटकांत 6 बाद 213 धावा केल्या. यात सिद्धेश वीरने 11 चौकारांसह 101 चेंडूंत 86 धावा, तर शॉन रॉड्रिक्‍सने 31 धावा केल्या. सिद्धेश व शॉन यांनी तिसऱ्या गडयासाठी 66 चेंडूंत 68 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अखिलेश गवळेपाटीलने नाबाद 30 व श्रेयस वालेकरने 28 धावा करून पीवायसीला सुस्थितीत नेले. 
विजयासाठी 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेय भावेच्या अचूक गोलंदाजीपुढे व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा डाव 42.2 षटकांत सर्वबाद 188 धावांवर संपुष्टात आला. व्हेरॉकच्या यश जगदाळेने केलेली 41 धावांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पीवायसीकडून अमेय भावेने 13 धावांत 3 बळी घेतले. साहिल चुरी व आदित्य लोंढेने प्रत्येकी 2 तर आर्य जाधव व यश माने याने प्रत्येकी 1 गडी बाद केला. 
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार व्हेरॉकच्या सौरभ नवलेला, तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पीवायसीच्या साहिल चुरीला देण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार व्हेरॉकच्या ऍलन रॉड्रिग्जला, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार पीवायसीच्या साहिल मदनला, तसेच मालिकावीर पुरस्कार साहिल चुरीला देण्यात आला. या सर्वांना यांना पीवायसीतर्फे प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार स्वर्गीय राजू भालेकर यांच्या पत्नी ऋजुता भालेकर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, आणि गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्‍लबचे सचिव आनंद परांजपे, खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रणजित पांडे, कपिल खरे, ज्योती गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
सविस्तर निकाल- 
अंतिम फेरी- पीवायसी हिंदू जिमखाना- 45 षटकांत 6 बाद 213 (सिद्धेश वीर 86, अखिलेश गवळेपाटील नाबाद 30, शॉन रॉड्रिग्ज (34), श्रेयस वालेकर 28 , यश माने नाबाद 18, राहुल वारे 38-3, साईगणेश जीदाप 18-1, ऍलन रॉड्रिग्ज 27-1, ओम भोसले 44-1) वि.वि व्हेरॉक क्रिकेट अकादमी- 42.2 षटकांत सर्वबाद 188 (यश जगदाळे 41, किरण मोरे 33, सौरभ नवले 29, तुषार रिंदे 28, राहुल वारे 26, अमेय भावे 13-3, साहिल चुरी 35-2, आदित्य लोंढे 45-2, आर्य जाधव 31-1, यश माने 24-1), सामनावीर- सिद्धेश वीर; इतर पारितोषिके- सर्वोत्कृष्ट फलंदाज- सौरभ नवले (व्हेरॉक) 
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- साहिल चुरी (पीवायसी), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- ऍलन रॉड्रिक्‍स (व्हेरॉक), सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक- साहिल मदन (पीवायसी), मालिकावीर- साहिल चुरी (पीवायसी). 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)