कौटुंबिक न्यायालयात वाद घेऊन गेलेले इंजिनिअर दांपत्य समुपदेशनामुळे आले पुन्हा एकत्र

दोघांच्या वकिलांनी केले विशेष प्रयत्न

पुणे – समुपदेशानामुळे इंजिनिअर दांपत्यांचा मोडकळीस आलेला संसार वाचला आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे कौटुंबिक न्यायालयात पोहोचलेला वाद मिटला. पतीने पत्नीला नांदविण्याची तयारी दाखविल्यानंतर त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह एप्रिल 2016 मध्ये थाटामाटात झाला. दोघेही उच्चशिक्षीत इंजिनिअर आहेत. दोघेही आई-वडिलांना एकुलते एक आहेत. त्यामुळे ते लाडात वाढले आहेत. माधव हा खेड्यात वाढलेला असल्याने त्यांच्या संस्कारात थोडाफार फरक होता. तर माधवी शहरात वाढलेली मोकळया विचारांची होती. परंतु, नांदायला गेल्यानंतर सासरच्यांकडून मानसिक छळ होऊ लागला. घरातील काहीही वस्तू खराब झाली किंवा वाया गेल्यास ती वस्तू माहेरहून आणण्यास तिला सांगितले जाऊ लागले. सासरचा अजब त्रास तिच्या पचनी पडेनासा झाला. दोन महिन्यानंतरच तिला सारच्यांकडून घर सोडून जाण्यासाठी दबाव आणला जावू लागला. परंतु, नांदणे अश्‍यकच वाटल्याने शेवटी तिने माहेर गाठले. तेव्हा ती खूप घाबरलेली भेदरलेली होती. संसार म्हणजे भयंकर प्रकार आहे असा तिचा समज झाला. दोन ते तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर तिच्या आई वडीलांनी कायदेशीर मदत घेण्याचे ठरविले. ऍड. मीनाक्षी डिंबळे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु काही केल्या माधव तिला नांदवायला तयार नव्हता. माधवीला दरमहा 10 हजारांची पोटगी आणि पाच हजार रूपये तक्रार अर्जाच्या खर्च स्वरूपात देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शैलजा सावंत यांनी दिले. त्यानंतर पोटगी वसूलीचा खर्च दाखल करण्यात आला. मात्र, यादरम्यान ऍड. डिंबळे यांच्या प्रयत्नांना यश आले. माधवच्या वकिलांनीही त्याला समजावले. माधव हळूहळू माधवीशी बोलू लागला. चर्चेनंतर माधवने माधवीसाठी संसाराचे दार पुन्हा उघडले. वेगळे घर घेऊन दोघांनी पुन्हा नव्याने संसार सुरू केला आहे. एक घर आणि संसार वाचविता आला याबाबत आनंदी असल्याचे ऍड. डिंबळे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)