कोहिंडेत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढत वृक्षारोपण

राजगुरूनगर – कोहिंडे (ता. खेड) येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र शासनाचा “एकच लक्ष दोन कोटी वृक्ष’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले. खेड तालुक्‍यातील राजगुरुनगरपासून 37 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम भागात कोहिंडे गावात आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी जीव, जल, आणि जंगल यांचे संवर्धन करण्यासाठी शुक्रवारी (दि. 5) वृक्ष दिंडीचे आयोजन केले होते. त्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. शासकीय आश्रम शाळेच्या परिसरात एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी पारंपारिक पालखीसह वेशभूषा करून त्यामध्ये विठ्ठल रूखमाई, संत ज्ञानेश्‍वर, मुक्‍ताई, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरागत वेशभूषेतील पात्रांनी दिंडीचे लक्ष वेधून घेतले. वृक्षदिंडी आंबोली व कोहिंडे गावातून काढण्यात आली. या दिंडीतून “पाणी आडवा पाणी जिरवा’, “वृक्ष हेच जीवन’, अशा अनेकविध संकल्पना या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध घोषणा तसेच भाषणांतून ग्रामस्थांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. याकरिता घोडेगाव प्रकल्पाच्या अपर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नंदिनी आवडे यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी शाळा आणि गावातील परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. शाळेचे मुख्याध्यापक गणेश गावडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.