कोहलीच्या दुखापतीवर अहवालाची निवड समितीला प्रतीक्षा 

वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज होणार? 
नवी दिल्ली – वेस्ट इंडीजविरुद्ध पुढच्या आठवड्यांत सुरू होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज होऊ शकली नाही. कर्णधार विराट कोहलीच्या मनगटाला दुखापत झाल्याचे समजल्यानंतर या दुखापतीबाबत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. हा अहवाल मिळाल्यानंतरच संघनिवड जाहीर करण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, कोहलीच्या मनगटाला दुखापत झाली असून त्याच्या वैद्यकीय चाचण्याही पार पडल्या आहेत. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सपोर्ट स्टाफकडून कोहलीच्या दुखापतीबद्‌ल वैद्यकीय अहवालाची निवड समितीला प्रतीक्षा आहे. कोहलीला ही दुखापत कशी झाली हे मात्र स्पष्ट जालेले नाही. त्याला ही दुखापत इंग्लंड दौऱ्यात होणे शक्‍य आहे किंवा सरावादरम्यान त्याचे मनगट दुखावले असू शकेल. परंतु दुखापतीचे स्वरूप स्पष्ट झाल्याशिवाय संघनिवड जाहीर करण्यात येणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोहलीची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाल्यास निवड समिती विंडीजविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करेल. परंतु कोहलीची दुखापत किरकोळ नसल्यास केवळ पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला जाईल, असे समजते. तसेच जसप्रीत बुमराह व भुवनेश्‍वर कुमार यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे. बुमराहने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटींमध्ये 133 षटके टाकली असून आशिया चषक स्पर्धेत दुबईतील उष्ण हवामानातही तो सर्व सामन्यांत खेळला.

अश्‍विन तंदुरुस्त, पृथ्वी शॉचा समावेश 
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन कंबरेच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. तसेच पृथ्वी शॉचा समावेश निश्‍चित दिसतो. अध्यक्षीय संघाकडून 90 धावांची खेळी करणाऱ्या मयंक आगरवालनेही आपला दावा पेश केला आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा आव्हानात्मक दौरा समोर असताना भारतीय खेळपट्टयांवर प्रामुख्याने यशस्वी झालेल्या शिखर धवनची विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी निवड करायची की नाही हासुद्धा निवड समितीसमोरचा मोठाच प्रश्‍न आहे. या बाबतीत विराट कोहलीचे मत निर्णायक ठरू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)