कोल्हापुरात गॅस स्फोटात 9 जखमी

दोघांची प्रकृती चिंताजनक
कोल्हापूर – कोल्हापूर शहरालागत असणाऱ्या पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील हौसिंग सोसायटीमध्ये सकाळी सातच्या सुमारास वायू गळतीने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक लहान मुलगी, दोन महिलांसह नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महेंद्र पाटील, मारुती सुतार, निलेश पाटील, निलेश आढाव, सागर पाटील, सुधाराणी काडगोंड, निल्लवा काडगोंड, दिनकर जाधव, श्रावणी काडगोंड अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निल्लवा काडगोंड या सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरू करत होत्या. पण सिलिंडर संपल्याने त्यांनी घरमालकीण पाटील यांना बोलाविले. त्यांनी सिलिंडर जोडून दिले व त्या निघून गेल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर निल्लवा यांनी गॅस सुरू केला असता गॅसचा वास येऊ लागला. वास आल्याने वरच्या मजल्यावर राहणारे सर्वजण धावत खाली आले. त्यांनी निल्लवा यांच्या स्वयंपाक घरात प्रवेश करून गॅस कनेक्‍शन बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेगडीशी जोडलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाक खोलीत असणाऱ्या व्यक्तींसह नऊ जण जखमी झाले. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सरपंच शशिकांत खवरे, हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष राजू पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)