कोरेगाव-भीमा दंगलग्रस्तांना मिळणार भरपाई

संग्रहित छायाचित्र

शिरूर तहसीलदारांकडे 8 कोटींचा निधी वर्ग : लवकरच वितरण

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एक जानेवारी रोजी उसळलेली दंगल व त्याचे सणसवाडी परिसरात उद्‌भवलेले पडसाद यामुळे या भागात तब्बल 9 कोटी 48 लाख 55 हजार 765 रुपयांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले होते. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीतील नुकसानग्रस्तांना भरपाई देणार असे स्पष्ट केले होते. त्यानुसार 7 कोटी 97 लाख 90 हजार 670 रुपयांचा निधी तहसीलदार शिरूर यांच्याकडे जमा झाला असून दंगलीतील नुकसानग्रस्तांना त्याचे थोड्याच दिवसांत वितरण करण्यात येणार असल्याचे शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव भीमा येथे 1 व 2 जानेवारी 2018 रोजी उद्‌भवलेल्या दोन गटांतील संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे उसळलेल्या दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शिरुर तहसिलदार रणजीत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये महसुल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या प्रतिनीधींचा समावेश होता. तीन जणांच्या विविध पथकांनी अभ्यासपूर्ण नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर केले.

पंचनाम्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ही रक्कम जुलै 2018च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात येऊन 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. 6 ऑगस्ट रोजी 7 कोटी 97 लाख 90 हजार 670 रुपयांचा निधी तहसीलदार शिरूर यांच्याकडे जमा झाला असून दंगलीतील नुकसानग्रस्तांना त्याचे थोड्याच दिवसांत वितरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

पंचनाम्यात साडेनऊ कोटींचे नुकसान

या दंगलीमध्ये झालेल्या दगडफेक, तोडफोड, जाळपोळीमध्ये 9 कोटी 48 लाख 55 हजार 765 रुपयांचे नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात आले. यामध्ये 116 चारचाकी वाहने, 95 दुचाकी, 18 घरे, तीन बस, 1 अग्निशमन वाहन, 8 ट्रक, 1 जेसीबी, 76 हॉटेल आणि 14 गॅरेजचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने दंगलीमध्ये नुकसान झालेल्या स्थानिक नागरिकांसह बाहेरुन आलेल्या नुकसानग्रस्त वाहनांचेही पंचनामे केले होते. जाळपोळीमध्ये नुकसान झालेल्या वाहनांचे नंबर प्लेट, चासी नंबरवरुन वाहनमालकांचा शोध घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे ज्या वाहनमालकांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन व कोरेगाव भीमा व सणसवाडी तलाठी कार्यालयामध्ये नुकसानीची माहिती दिली होती त्यांचेही नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते.

कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरूर) दंगलीतील नुकसान ग्रस्तांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी रक्कम रोख स्वरुपात न देता नुकसानग्रस्ताच्या थेट बॅंक खात्यावर 31 जानेवारी 2019 पूर्वी जमा करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्याप्रमाणे नुकसानग्रस्तांनी शिरूर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
-रणजीत भोसले, तहसीलदार शिरूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)