कोरिया ओपन वर्ल्ड टूर बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयराम, वैदेही यांचे आव्हान संपुष्टात

सेऊल: गुणवान युवा खेळाडू अजय जयरामसह उदयोन्मुख महिला खेळाडू वैदेही चौधरी व मुग्धा आग्रे यांना आपापल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागल्यामुळे या तीन भारतीय खेळाडूंचे कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. स्पर्धेची पात्रता फेरी आज संपली असून मुख्य स्पर्धेला उद्या (बुधवार) प्रारंभ होत आहे.

त्याआधी पुरुष एकेरीच्या पात्रता पेरीतील पहिल्या सत्रात भारताच्या अजय जयरामला चीनच्या झाओ जुनपेंगविरुद्ध कडव्या झुंजीनंतर 24-26, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीच्या पात्रता फेरीतील पहिल्या सत्रात वैदेही चौधरी व मुग्धा आग्रे यांना एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. कोरियाच्या किम गा युन हिच्याविरुद्ध वैदेही चौधरीला जराही संधी मिळाली नाही व तिने 8-21, 8-21 असा पराभव पत्करला. तसेच जगातील माजी अग्रमानांकित खेळाडू चीनच्या ली झुएरुईने मुग्धा आग्रेचा 21-8, 21-8 असा फडशा पाडताना भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अत्यंत आव्हानात्मक अशा या स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि अव्वल पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांत यांच्या अनुपस्थितीत भारताची मदार सायना नेहवाल आणि समीर वर्मा या खेळाडूंवरच आहे. सायनासमोर आता जागतिक बॅडमिंटन स्पर्धामालिकेत तितकेसे यश मिळालेले नाही. कोरिया ओपन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत सायनाची गाठ जपानच्या तृतीय मानांकित नोझोमी ओकुहाराशी पडण्याची शक्‍यता आहे.

तसेच समीर वर्मासमोर पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या अँडर्स अँडरसनचे कडवे आव्हान आहे. तसेच अँडरसनला पराभूत केल्यास समीरला दुसऱ्या फेरीत थेट जगज्जेत्या केन्टो मोमोटाशी झुंज द्यावी लागेल. भारताची वैष्णवी रेड्डीही या स्पर्धेत सहभागी होत असून सलामीच्या फेरीत तिच्यासमोर अमेरिकेच्या सहाव्या मानांकित बेईवान झांगचे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)