कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सायना उपान्त्यपूर्व फेरीत 

सेऊल: भारताची अनुभवी खेळाडू सायना नेहवालने संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताचा अव्वल पुरुष खेळाडू समीर वर्मा आणि युवा महिला वैष्णवी रेड्डी यांचे स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. 
पाचव्या मानांकित सायना नेहवालने महिला एकेरीतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात कोरियाच्या बिगरमानांकित किम गा इयुनचे आव्हान 21-18, 21-18 असे चुरशीच्या लढतीत मोडून काढले आणि अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. सायनाने ही लढत 37 मिनिटांत जिंकली. सायनाने त्याआधी कोरियाच्या किम हयो मिन हिचा पराभव करीत दुसऱ्या फेरीत धडक मारली होती. तर किमने पहिल्या फेरीच्या सामन्यात आपल्याच देशाच्या ली से येऊन हिची कडवी झुंज अशी मोडून काढताना विजयी सलामी दिली होती. 
जानेवारी महिन्यांत इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील उपविजेतेपदानंतर गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि जकार्ता आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सायनासमोर उपान्त्यपूर्व फेरीत जपानच्या तृतीय मानांकित व माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहाराचे कडवे आव्हान आहे. ओकुहाराने आणखी एका लढतीत चीनच्या यिप पुई यिनचा प्रतिकार 21-16, 21-15 असा 34 मिनिटांत संपुष्टात आणताना आगेकूच केली. 
महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीतील अन्य लढतींमध्ये जपानच्या अग्रमानांकित आकाने यामागुचीसमोर चीनच्या आठव्या मानांकित गाओ फॅंघजिएचे आव्हान आहे. तर कोरियाच्या चतुर्थ मानांकित संग जि हयुनसमोर जपानच्या सातव्या मानांकित सायाका ताकाहाशीचा अडथळा आहे. तसेच अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत मलेशियाच्या बेईवान झांगची गाठ कॅनडाच्या बिगरमानांकित किर्स्टी गिलमूरशी पडणार आहे. गिलमूरने द्वितीय मानांकित रत्चानोक इन्तेनॉनवर मात करताना स्पर्धेतील सर्वाधिक सनसनाटी निकालाची नोंद केली. 
जागतिक स्पर्धेतील रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि स्टार पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांत यांच्या गैरहजेरीत समीर वर्माही सलामीलाच पराभूत झाल्यामुळे या स्पर्धेत भारताची मदार सायना नेहवालवरच आहे. सिंधू आणि श्रीकांत यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विश्रांती देण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी घेतला आहे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)