कोणाचे किती चान्सेस? (अग्रलेख)

सध्या महाराष्ट्रासह सात राज्यांतील 252 जागांवर महाआघाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पण या शक्‍यतेचे रुपांतर खात्रीमध्ये होण्याची गरज आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू काश्‍मीर या सात राज्यांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. याच सात राज्यांमध्ये 252 जागा आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत भाजपने त्यापैकी जवळपास 150 जागांवर विजय मिळविला होता. 
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोंदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आतापासूनच आगामी निवडणुकीची तयारी केली असली, तरी भाजपच्या यशाबद्दल तज्ञ काय म्हणत आहेत, हे अधिक महत्वाचे आहे. प्रख्यात आर्थिक व राजकीय विश्‍लेषक रूचीर शर्मा यांनी केलेल्या विश्‍लेषणानुसार, “सन 2017 मध्ये निवडणूक झाली असती तर मोदी पुन्हा निवडून येण्याची शक्‍यता 99 टक्के होती; ती आता थेट 50 टक्के इतकी खाली आली आहे. “मोदी-विरोधक एकत्र येत आहेत; त्यामुळे मोदींची फेर निवडीची शक्‍यता कमी होऊ लागली आहे,’ असा महत्वाचा आणि भाजपचा कान उघडणारा निष्कर्षही त्यांनी काढला आहे.
दुसरीकडे, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. “उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विरोधी पक्षांची आघाडी झाली, तर भाजपा सन 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. “उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आणि तशीच आघाडी बिहारमध्ये आकाराला आली, तर भाजपाला अनेक जागांवर फटका बसेल,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे; आणि ते खरेच आहे. म्हणजेच सध्या भाजपचे चान्सेस कमी झाले असताना, कॉंग्रेसचे चान्सेस वाढताना दिसत आहेत. तरीही निवडणुकीला अद्याप नऊ महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने या कालावधीत निवडणूक व्यवस्थापनात जो पक्ष आघाडी घेईल, तोच पक्ष बाजी मारेल, हे निश्‍चित आहे.
सत्तेवर असल्याने भाजप मतदारांना खुश करण्याची एकही संधी सोडणार नाही, हे वास्तव स्वीकाररतानाच, विरोधी पक्षांना केंद्र सरकारचे गेल्या चार वर्षातील अपयश मतदारांसमोर मांडण्याचे काम करावे लागेल. रूचीर शर्मा यांच्या विश्‍लेषणाप्रमाणे, “सन 2014 च्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 31 टक्के इतकीच होती. तथापी विरोधक विखुरलेले असल्याने, कमी मते मिळूनही भाजपला बहुमत मिळाले होते. पण आता विरोधी पक्षांमध्ये होत असलेली एकी मोदींना आव्हानात्मक ठरणार आहे,’ असे त्यांचे मत आहे. एका तज्ञाचे हे महत्वपूर्ण विश्‍लेषण लक्षात घेऊनच, आता कॉंग्रेसला आपली रणनिती आखावी लागणार आहे. कॉंग्रेसने त्या दिशेने हालचालीही सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीच्या काळात कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी कॉंग्रेसने तीन महत्वाच्या समित्या स्थापन केल्या आहेत. आपसात समन्वय, प्रसिद्धी आणि जाहीरनाम्याची जबाबदारी या समित्यांकडे असणार आहे.
अर्थात स्वत:चा पक्ष वाढवण्यासाठी कॉंग्रेसने या हालचाली सुरु केल्या असल्या, तरी दुसरीकडे महाआघाडी स्थापन करुन ती वाढवण्याचे प्रयत्न करुन निवडणुकीत जिंकण्याचे चान्सेस वाढवण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रासह सात राज्यांतील 252 जागांवर महाआघाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पण या शक्‍यतेचे रुपांतर खात्रीमध्ये होण्याची गरज आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू काश्‍मीर या सात राज्यांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. याच सात राज्यांमध्ये 252 जागा आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत भाजपने त्यापैकी जवळपास 150 जागांवर विजय मिळविला होता. तर भाजपच्या घटक पक्षांनी डझनभर जागा याच राज्यांमध्ये जिंकल्या होत्या.
भाजपविरोधी पक्ष एकजूट नसल्यामुळेही भाजपचा फायदा झाला होता. हेच लक्षात घेत, आता कॉंग्रेसने मोठे मन केले आणि मित्र पक्षांना महत्व दिले, तरच मोदी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांच्या अस्मिता जपण्याचे काम कॉंग्रेसला करावे लागणार आहे. कॉंग्रेसच्या महाआघाडीत सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या बहुतेक पक्षांना आपापल्या राज्यातील सुभेदारीही राखायची आहे. राज्यात सत्ता मिळवण्यातच त्यांना अधिक रस आहे. त्यामुळे एकेकाळी देशातील बहुतेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला त्या राज्यांमध्ये लहान भावाची भुमिका स्वीकारणे मान्य होणार आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर महत्वाचे आहे.देशातील मोठ्या राज्यांनी गेल्या काही वर्षात कॉंग्रेसला हुलकावणी दिली आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना प्राधान्य देत, कॉंग्रेसने दुय्यम भुमिका घेतली तर लोकसभा निवडणुकीत हे पक्ष कॉंग्रेसल प्रमुख भूमिका घेऊ देतील, अशी शक्‍यता आहे.
पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी कॉंग्रेसला वाटाघाटींचे चांगले राजकारण करावे लागणार आहे. हे सर्व केल्यामुळे कॉंग्रेस आघाडीचे चान्सेस वाढण्याची शक्‍यता असली, तरी दुसरीकडे सत्ताधारी भाजपही गप्प बसाणार नाही. ही निवडणूक आपल्याला सोपी जाणार नाही, याची कल्पना असल्याने शहा आणि मोदी कसून प्रयत्न करतीलच. शहा यांनी जगा वाढवण्याच्या हेतूने पश्‍चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यांमध्ये केलेली पेरणी लक्षात घेण्यासारखी आहे. सन 2014 मध्ये ज्या राज्यात जास्त जागा मिळाल्या होत्या, त्या राज्यात सन 2019 मध्ये जागा कमी झाल्या, तरी फटका बसू नये म्हणून, इतर राज्यांमधील जागा वाढवण्याची साधीसोपी रणनिती अमित शहा यांनी आखली आहे. मोदी आपल्या पोतडीतून घोषणांचा पाऊस पाडत राहतीलच. आपण किती पाण्यात आहोत हे लक्षात आल्यानेच सर्वांनीच पावले टाकायला सुरुवात करुन आपले चान्सेस वाढवण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत, असेच सध्याचे चित्र आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)