कोट्यवधींच्या जागा लाटण्याचा शिवसेनेचा डाव उधळला

महापालिकेच्या जागा धनदांडग्यांना देण्याचा ठराव शासनाकडून रद्द

नगर – महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधीच्या जागा स्थायी समितीमध्ये ठराव करून धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव शासनाने उधळून लावला. स्थायी समितीच्या दहा एप्रिल 2017 व 16 फेब्रुवारी 2017 झालेल्या सभेत शहरातील 18 धनदांडग्यांना देण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव संपूर्णपणे नियमबाह्य व ठराविक व्यक्‍तींना लाभ देण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा ठपका ठेवला होता. स्थायी समितीने केलेले ठराव नगरविकास खात्याने महापालिका अधिनियमातील कलम 451 (1) नुसार रद्द केले आहेत. धनदांडग्यांना देण्यात आलेल्या जागा येत्या महिन्याभरात ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्‍तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा चांगलाच “फियास्को’ झाला आहे.
महापालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधींच्या जागा बड्या-धेडांना देऊन कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रयत्न केला. त्याला शासनाने चाप लावला आहे. स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव असताना अनेक चुकीचे निर्णय झाले. त्यापैकी 10 एप्रिल 2017 रोजी झालेल्या सभेच्या विषपत्रिकेत कोलते यांची 2013-14 पाणीपट्टी रक्‍कम निर्लेखित करण्याचा विषय असताना त्यापुढे डॉ. संदीप सुराणा यांना आरक्षण क्र 70 मधील 186 चौरस मीटर क्षेत्र भाडे अनामत रकमेवर देण्यास मान्यता दिली. विलास काळभोर यांची पाणीपट्टी निर्लेखित करण्याचा विषय घेऊन त्याच्यापुढे नईमोदीन काझी यांना स.न.51 मधील राज चेंबर्स इमारतीती शेजारील खुल्या जागेपैकी 15 बाय 30 चौरस फूट मोकळी जागा देण्यास मान्यता तसेच गजानन पंगुडवाले यांना प्रमोद महाजन केंद्रालगतची 10 बाय 15 चौरस मीटर जागा देण्यास मान्यता दिली. छकुबाई ठोंबे यांची पाणीपट्टीची रक्‍कम निर्लेखित करणे हा विषय असताना पुढे मोहित मदान त्यांना नोबल रुग्णालयाच्या जवळील जागा भाड्याने देण्यास मान्यता, राजेंद्र प्रकाश सैंदर यांना ग्राहक भंडार परिसरातील जागा देणे, प्रमोद ठुबे यांना अंबिकानगर बसस्थानकाजवळील बालाजी कॉम्लेक्‍सजवळील 10 बाय 15 जागा देण्यास मान्यता, परिचारिकेची मानधनावर नियुक्‍ती करणे, सागर सुभाष भालेराव यांना गाडगीळ पटांगण भाजीमार्केट भिंतीजवळील खुल्या जागेपैकी 10 बाय 10 चौसर मीटर जागा देण्यास मान्यता, अंजिक्‍य नांगरे यांना स्वास्तिक चौकातील 10 बाय 20 चौरस मीटर जागा भाडे देण्यास मान्यता, सतीश जगताप यांना अमरधाम जवळील 15 बाय 20 चौसर मीटर जागा देण्यास मान्यता, ग्राहक भंडाराजवळील स्वच्छतागृहाच्या जवळील जागा भास्कर थोरात, विलास बिडवे, संजय शिंगटे, चंद्रकांत बिडवे यांना भाड्याने देण्यास मान्यता, केडगावमधील मोकळा भूखंड भाजी विक्रेत्यांना देणे आदी ठराव करण्यात आले होते. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत कर्मचाऱ्यांना मोबाईल सिमकार्ड देण्याचा विषय घेऊन त्याच्याआडून नेरली नाका चौक येथील हॉटेल शिव जवळील मोकळी जागा राहुल लांडे, राजेश म्हस्के, अतिश भवर, भरत शेळके यांना देण्यास मान्यता देण्यात आली. या जागा कोट्यवधी रुपयांच्या असताना केवळ नाममात्र भाडे आकारून त्या देण्याचा घाट शिवसेनेने घातला होता. त्या जागा संबंधितांना देण्यात आल्या होत्या. या विरोधात जागरुक मंच या संस्थेने न्यायालयात धाव घेऊन स्थायी समितीने केलेले नियमबाह्य ठराव रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शासनाला त्याबाबत आदेश दिल्यानंतर शासनाने चार दिवसांपूर्वी या जागा परत घेण्याचा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुक्तांवरही ठपका

स्थायी समिती अथवा महासभेत झालेले नियमबाह्य ठराव महापालिका अधिनियमातील कलम 451 (1) नुसार विखंडीत करण्याची जबाबदारी आयुक्‍तांची आहे; परंतु आयुक्‍तांनीदेखील हे ठराव तसेट मंजूर केल्याचा ठपका शासनाने ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)