कॉंग्रेस बचावसाठी मोर्चे काढा; संविधानाचे आम्ही बघू

रिपाइंच्या राज्यव्यापी अधिवेशनात रामदास आठवले यांचा टोला

पुणे- कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी वारंवार संविधान बचावचा नारा देत मोर्चे काढत आहेत. मात्र, संविधान वाचविण्यासाठी मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहोत. तुम्ही कॉंग्रेस बचावचे बघा, अशा शब्दात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर टीका केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइं- भाजप सोबत जाणार असल्याचे आठवले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. रिपाइंचे राज्यव्यापी अधिवेशन रविवारी पुण्यात पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्‍ता टिळक, खासदार आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार राहुल कुल, अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष एम. डी. शेवाळे, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हणमंत साठे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आठवले म्हणाले की, रिपाइंने भाजपसोबत युती केली आहे. भाजपकडून राज्यघटनेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी संविधान बचावासाठी मोर्चे काढत आहेत. मात्र, त्यांना आता कॉंग्रेस बचाव म्हणण्याची वेळ आली आहे. संविधान वाचविण्यासाठी मी आणि पंतप्रधान मोदी सक्षम आहोत. त्यामुळे आगामी निवडणुका भाजपसोबत लढविल्या जातील.

शिवसेनेने आमच्या सोबत यावे ही रिपाइंची इच्छा आहे. मात्र, ते नाही आल्यास आम्ही एकत्र लढू, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अधिवेशनास दिलेल्या शुभेच्छा चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्या. तर पालकमंत्री बापट आणि राज्यमंत्री कांबळे यांनी शासन दलितांच्या पाठीशी असून त्यांच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे यावेळी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम वाडेकर यांनी केले. मंदार जोशी यांनी आभार मानले.

अधिवेशनात बोलण्याची संधी न दिल्याने रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष महेश शिंदे यांनी नाराजी व्यक्‍त करत कार्यकर्त्यांसह अधिवेशनातून निघून गेले. त्यानंतर आठवले बोलण्यासाठी उभे राहिले असता, शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आठवले चांगलेच संतापले. मी भाषण देऊन नाही तर चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. अशा सभा मी सुध्दा उधाळल्या आहेत. मात्र, केवळ भाषण करून दिले नाही म्हणून असे करणे योग्य नाही. गर्दी जमवली म्हणून तुम्ही पक्षावर उपकार केले नाहीत. असे प्रकार करणाऱ्यांना पक्षात थारा नाही, तुम्ही गेलात तर 100 जण मागे असतात. हे लक्षात ठेवा, मी घाबरणार नाही तर खमक्‍या कार्यकर्ता आहे, असा सज्जड दम आठवले यांनी यावेळी उपस्थितांना भरला.

पुरावे नसतील तर आणखी एकदा पुरावे शोधा
भीमा कोरेगावप्रकरणी दलित समाजाच्या भावना तीव्र आहेत. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र, आमच्या भावना तीव्र असल्याने शासनाने पुन्हा पुरावे शोधावेत, अशी मागणी यावेळी आठवले यांनी यावेळी केली. या प्रकरणानंतर सोशल मीडियाद्वारे आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपणही त्यांना सोशल मीडियावरून जशास तसे उत्तर दिले असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)