कॉंग्रेसच्या नॅशनल हेरल्डविरोधात 5 हजार कोटींच्या मानहानीचा दावा

अनिल अंबानींच्या कंपन्यांचा राफेल करारावरून आक्रमक पवित्रा
अहमदाबाद – राफेल विमान करारावरून कॉंग्रेसकडून सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्या कंपन्यांनी कॉंग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेरल्ड या वृत्तपत्राविरोधात एका लेखावरून तब्बल 5 हजार कोटी रूपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपचा घटक असणाऱ्या रिलायन्स डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि रिलायन्स एरोस्ट्रक्‍चर या कंपन्यांनी शुक्रवारी येथील दिवाणी आणि सत्र न्यायालयात धाव घेतली. त्या कंपन्यांनी नॅशनल हेरल्डची प्रकाशक असणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीविरोधात आणि त्या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागाचे प्रमुख जफर आगा तसेच संबंधित लेखाचे लेखक विश्‍वदीपक यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराची घोषणा करण्याच्या 10 दिवस आधी अनिल अंबानींनी रिलायन्स डिफेन्सची स्थापना केली, अशा आशयाचा लेख त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. तो लेख मानहानीकारक असल्याचे रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांनी दाव्यात म्हटले आहे. लेखातून अनिल अंबानी आणि रिलायन्स ग्रुपची नकारात्मक प्रतिमा उभी करण्यात आली आहे.

सरकारने आमच्यावर अयोग्य व्यावसायिक मेहेरनजर केल्याचे जनतेला वाटावे अशी दिशाभूल लेखातून करण्यात आली आहे, असा आरोपही त्या कंपन्यांनी केला आहे. त्या कंपन्यांनी दाखल केलेल्या दाव्यावरून न्यायालयाने नोटिसा बजावून प्रतिवादींकडून 7 सप्टेंबरपर्यंत उत्तर मागवले आहे. रिलायन्स ग्रुपने याआधीच राफेल करारावरून होत असलेल्या आरोपांमुळे कॉंग्रेसच्या काही नेत्यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)