कॉंग्रेसच्या तिकिटांकडे इच्छूकांची पाठ ; चार विधानसभांमध्ये उमेदवारच नाहीत

पक्षाकडून अर्जांसाठी आठ दिवसांची मुदतवाढ

पुणे :  विधानसभा निवडणूका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या असतनाच; पुण्यातील आठ विधानसभांपैकी चार विधानसभा मध्ये पक्षाकडून निवडणूक लढविण्यास उमेदवारच इच्छूक नसल्याचे समोर आले आहे. प्रदेश कॉंग्रेस तसेच शहर कॉंग्रेसकडून अर्ज मागविण्यात आल्यानंतर शहरातून केवळ 20 ते 22 जणांचेच अर्ज आलेले असून कोथरूड, हडपसर, पर्वती, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघात अतिशय नगण्य प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, पक्षाकडून 6 जुलै पर्यंत अर्ज करण्याची असलेली मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली असून या वाढीव मुदतीत अर्जांची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.  कॉंग्रेसकडून शिवाजीनगर, कॅन्टोंन्मेंट, कसबा या तीन मतदारसंघा उमेदवारीसाठी चुरस असणार आहे.
पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून 2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यापूर्वी 2009 मध्ये दोन्ही पक्षांकडून चार जागा लढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आघाडीतील जागा वाट निश्‍चित झालेले नसले तरी, पक्षाकडून सर्व विधानसभांसाठी हे अर्ज मागण्यिात आले होते. मात्र, पक्षाकडे तीनच मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार आहेत. तर इतर ठिकाणी पक्षाला आलेला प्रतिसाद अतिशय नगण्य आहे.

शिवाजीनगर, कसब्यात तिकिटासाठी चढाओढ
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2009 मध्ये आघाडीत विधानसभा निवडणूका लढविल्या होत्या. त्यावेळी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार जागा लढविल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यात शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात कॉंग्रेसकडून या तीनही जागांवर दावा सांगण्यात येणार आहे. परिणामी या तीनही मतदारसंघात कॉंग्रेसकडे इच्छूकांची संख्या जास्त आहे. शिवाजी नगर मधून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, संजय अगरवाल, माजी अमदार दिप्ती चवधरी, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, ज्ञानेश्‍वर मोझे, तसेच कैलास गायकवाड यांनी पक्षाकडून अर्ज नेले आहेत.

                    तर कसब्यातून पक्षाचे विद्यमान गटनेते अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, विरेंद्र किराड, मिलिंद काची , मुख्तार शेख, विनय ढेरे यांनी अर्ज नेले आहेत, तर कॅन्टोन्टोन्मेंट मधून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह, रविंद्र आरडे, मुकेश धिवार, करणसिंग मकवाना, नगरसेविका लता राजगुरू यांनी अर्ज नेले आहेत. तर या तीनही मतदारसंघातील काही प्रमुख उमेदवारांनी थेट प्रदेशकडे अर्ज केले आहेत. त्यात बागवे यांच्यासह, अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचे अर्ज आहेत.

                            शिवाजीनगर मधून 2014 मध्ये विनायक निम्हण कॉंग्रेसच्या तिकिटावर लढले होते. मात्र, आता ते शिवसेनेत आहेत, तर कसब्यातून रोहीत टिळक यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली होती. तर धंगेकर यांनी मनसेतून त्यामुळे आता धंगेकर कॉंग्रेसमध्ये असल्याने कसब्यात, गटनेते शिंदे, धंगेकर तसेच रोहीत टिळक यांच्यात तिकिटासाठी चढाओढ असणार आहे.

 
पाच मतदारसंघात उमेदवारांची वानवा
उर्वरीत पाच मतदारसंघात कॉंग्रेसकडे उमेदवारांची वानवा असल्याचे चित्र आहे. खडकवासला मतदारसंघातून एकाही उमेदवाराने शहर कॉंग्रेस कार्यालयातून अर्ज घेतलेला नाही तर कोथरूड मधूनही अवघा संदीप मोकाटे यांचा अर्ज आहे. तर हडपसर मधून आता पर्यंत केवळ शंकर ढावरे यांचा अर्ज असून 2014 मध्ये हडपसर मधून लढलेले माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी थेट मुंबईत अर्ज दिल्याची शक्‍यता आहे. या शिवाय, वडगाव शेरीतून मुस्लीम को ऑपरेटीव्ह बॅंक़ेच्या इनामदार, रमेश सकट, भीवसेन रोकडे आणि विकास टिंगरे यांचेच अर्ज आहेत. तर पर्वती मतदारसंघातून नरेंद्र व्यवहारे, मुकेश धिवार, आणि सचिन तावरे यांचे अर्ज आहेत, 2014 मध्ये पर्वती मधून तावरे हे शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते. तर कॉंग्रेसकडून अभय छाजेड लढले होते. मात्र, शिवसेनेचे तावरे दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र आता तावरे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसकडून या जागेची मागणी आघाडीच्या जागा वाटपात केली जाण्याची शक्‍यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.