कॉंग्रेसकडून होणाऱ्या चिखलफेकीतच कमळ उगवेल

राफेलवरून होणाऱ्या टीकेला पंतप्रधानांचे उत्तर
भोपाळ – विकासाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यापेक्षा कॉंग्रेसला सरकारवर चिखलफेक करणे अधिक सोपे वाटते, अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल प्रकरणावरून कॉंग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. निवडणूका होणार असलेल्या मध्यप्रदेशातील सभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर देशाबाहेरील शक्तींशी संगनमत करण्याचा आरोप केला. देशामध्ये भरभक्कम आघाडी उभारण्यास अपयश आल्यामुळे देशाबाहेरून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी अलिकडेच राहुल गांधी यांनी “जेट गेट’चा (राफेल) पाठपुरावा केला तर तेच भारताचे पुढील पंतप्रधान होतील, असे वक्‍तव्य केले होते. त्या संदर्भाने मोदींनी ही टीका केली.

अहंकारामुळेच लोकसभेतील कॉंग्रेसच्या जागा 440 वरून घटून 44 झाल्या. तरीही कॉंग्रेस आत्मपरीक्षण करण्यास किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्यास तयार नाही. 125 वर्षे जुन्या कॉंग्रेस पक्षाची काय अवस्था झाली आहे. आता या पक्षाकडे सूक्ष्मदर्शकातून बघण्याची वेळ आली आहे, आता आघाडी करण्यासाठी लहान लहान पक्षांपुढे हात पसरण्याची वेळे कॉंग्रेसवर आली आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी कॉंग्रेसची खिल्ली उडवली.

जरी कॉंग्रेसला आघाडीसाठी पक्ष मिळाले, तरी त्यांची आघाडी यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळेच कॉंग्रेस देशाबाहेरून पाठिंबा मिळवायचा प्रयत्न करत आहे. सत्ता गमावलेल्या कॉंग्रेसने आपली उरली सुरली शिल्लक पतही गमावली, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली.

राफेल विमान व्यवहारातील गैरव्यवहाराच्या कॉंग्रेसच्या आरोपांबाबत बोलताना कॉंग्रेसने अशाप्रकारे पूर्वीही चिखलफेक केली आहे. दोन दशकांपासून कॉंग्रेस आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या चिखलातूनच भाजपचे कमळ पुन्हा पुन्हा उगवेल अशी आशाही त्यांनी व्यक्‍त केली.

तिहेरी तलाकवरूनही शरसंधान…
तिहेरी तलाक इस्लामी देशांमध्येही मान्य नाही. ज्या पक्षाच्या अध्यक्षा एक महिला आहेत, त्या पक्षालाही मुस्लिम भगिनींच्या दुःखाबाबत काहीही चिंता वाटत नाही. मतपेढीच्या राजकारणाचे हे विदारक चित्र आहे. मतपेढीच्या राजकारणामुळे समाजाचे वाळवीसारखे नुकसान केले आहे. मतपेढीच्या राजकारणापासून समाजाचे रक्षण करणे ही आमची विशेष जबाबदारी आहे. कॉंग्रेसने केवळ निवडणूका जिंकण्यासाठी देशाचे विभाजन केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)