केडगाव परिसरात निवडणूक प्रचाराबाबत उदासीनता

दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेतीची आणि पाण्याची चिंता

केडगाव- लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे; परंतु सध्या ग्रामीण भागावर दुष्काळाचे सावट असल्याने निवडणुकीपेक्षा शेतीचे नियोजन कसे करावे आणि पाण्याची गरज कशी भागवावी या विवंचनेत सामान्य नागरिक आणि शेतकरी असल्याने त्यांच्यात निवडणुकीबाबत आणि प्रचाराबाबत उदासीनता दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीचा फीव्हर सर्वत्र दिसून येत आहे. मागील कित्येक वर्षांपासून असणारे सर्वसामान्य जनतेचे तेच प्रश्न आजही समोर असल्याने नेते, कार्यकर्ते प्रचारात गुंग आहेत, तर सामान्य जनता निवडणुकींपासून कोसो दूर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शेतीमालाला हमीभाव नाही, घरगुती गॅस आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती, बेरोजगारी, भ्रष्टाचार, वशिलेबाजी असे एक ना अनेक प्रश्न जनतेसमोर आ वासून उभे आहेत. शासन कोणत्याही पक्षाचे असो सामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी निगडित असणाऱ्या वरील समस्यांमध्ये मागील काही वर्षांपासून तसूभरही फरक पडलेला दिसत नाही.

मागील वर्षी पाऊस झालाच नाही, त्यामुळे सध्या दौंड तालुक्‍याचा मुळा-मुठा आणि भीमा नदीचा किनारी पट्टा वगळल्यास तालुक्‍याच्या मध्यवर्ती आणि दक्षिण भागात पाण्याची समस्या भयानक होऊ लागली आहे, त्यामुळे वरकरणी घरी प्रचारसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पक्षप्रमुखांना हो हो करून टाळले जात आहे. निवडणुकीपेक्षा शेतीतील उपलब्ध पाण्यावर पिके जगवणे आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्याकरता सामान्य माणसाची धडपड चालू आहे.

  • दैनंदिन समस्या सोडण्यात मतदार मग्न
    केडगाव आणि परिसरातील बोरीपार्धी, चौफुला भागात सध्या पाण्याची समस्या उग्र होताना दिसत आहे. शेतीत असणारे पीक जगवण्यासाठी कालव्याच्या पाण्याची शेतकरी आणि सामान्य नागरिक सध्या वाट पाहत आहे. मतदान राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते चुकवायचे नाही; परंतु सध्या समोर उभ्या असणाऱ्या समस्या सोडवणे महत्त्वाचे वाटते अशी भावना सामान्य माणसांत आहे. एकंदरीत विविध पक्षांचे कार्यकर्ते, नेते व पक्षप्रमुख प्रचारात उतरून सामान्य मतदाराकडे जात असला तरी मतदार दैनंदिन इतर कामांना प्राधान्य देताना दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.