केजुदेवी उद्यानातील धबधब्यातून मैलामिश्रीत पाणी

पिंपरी – थेरगाव येथील केजुदेवी बंधारा सध्या स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी डोकेदुखी बनला असून मागील काही दिवसांपासून उद्यानात असलेल्या धबधब्यातील खडकामधून मैलामिश्रीत पाण्याचा विसर्ग होत असल्याने उद्यान आणि परिसरात दलदल निर्माण झाली असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पर्यटकांनी ऐन पावसाळ्यात या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.

केजुदेवी उद्यान परिसर हा निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने नटलेला आहे. त्यातच वर्षभर तुडूंब भरून वाहणारा बंधारा व किनाऱ्याला लागूनच थेरगावची ग्रामदेवता असलेले श्री केजुदेवी मातेचे टुमदार मंदिर यामुळे हे ठिकाण पिंपरी-चिंचवड शहरातील एक आकर्षक पर्यटन केंद्र म्हणून नावलौकीक पावलेले आहे. येथे फेरफटका मारण्यासाठी फिरायला येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. उद्यानात तयार करण्यात आलेल्या धबधब्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र मागील काही दिवसांपासून उद्यानातील धबधबा बंद अवस्थेत असून त्यामधून सध्या मैलामिश्रीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे उद्यान परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याचा नाहक फटका पर्यटकांना बसत असून कुटुंबासहीत फिरायला येणारे पर्यटक नाराज होऊन निघून जातात. यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. उद्यानाच्या जवळच एक खासगी कंपनी असून हा पल्प मिश्रीत मैला त्याच कंपनीतून येत असावा, अशी चर्चा आहे. उद्यानातील धबाधब्यातून मैलामिश्रीत पाणी कोठून येते, याची चौकशी करुन महापालिकेच्या उद्यान विभागाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.

उद्यानातील धबधबा काही तांत्रिक कारणास्तव बंद असल्याचे पालिका अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले आहे. महापालिकेकडून लवकरच धबधब्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. लवकरच तो पर्यटकांसाठी खुला होईल. मात्र सध्या यामध्ये बाहेरील बाजुने मैलामिश्रीत पाणी आत येत असल्याने धबधब्यामध्ये सर्वत्र पल्प साठलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. हे पल्प मिश्रीत पाणी कोठून येते याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई होणे गरजेचे आहे .
– सनी सेबास्टीन, वॉटर स्पोर्ट्‌स व्यवस्थापक, केजुदेवी उद्यान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)