कृष्णा हॉस्पिटलमध्ये “प्लाझ्मा थेरपी’स मान्यता

करोनामुक्तांना "प्लाझ्मा' दान करण्याचे आवाहन

कराड – पश्‍चिम महाराष्ट्रात करोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला “प्लाझ्मा थेरपी’स मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय असून या थेरपीचा लाभ करोनाग्रस्त रूग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे. करोनामुक्‍त झालेल्या लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने करोनाविरूद्धच्या लढाईत पूर्वीपासूनच आघाडी घेतली आहे. सर्वांत पहिल्या विशेष करोना वार्डची निर्मिती, जिल्ह्यातील पहिली करोना चाचणी लॅब, करोना लस संशोधनात सहभागी असणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था अशी कामगिरी करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र अन्न व औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलला नुकतेच प्राप्त झाले आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपर्यंत प्रभावी औषध निर्माण झाले नाही. तसेच त्याच्या प्रतिबंधाची लसही अजून संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्‍वभूमीवर करोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे. जिल्ह्यात कृष्णा हॉस्पिटलमध्ये गरजू रूग्णांवर या प्लाझ्मा थेरपीचा अवलंब केला जाणार आहे.

कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली. याचा फायदा करोनाबाधितांना होणार आहे. करोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांनी आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे.
डॉ. सुरेश भोसले , चेअरमन, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कराड

Leave A Reply

Your email address will not be published.