कृतज्ञतेची बाराखडी…

अभिजित आणि पूनम व्यवसायाने डॉक्‍टर, प्रॅक्‍टीसही बऱ्यापैकी जमलेली, डॉक्‍टरी व्यवसायामुळे होणाऱ्या सामजिक संपर्काने मित्र परिवारही वाढीस लागलेला. त्यामुळे संपर्कात असलेली बरीच मंडळी त्यांच्याकडे सल्ला उपचारालाही येत. दोघेही ओळखीच्या लोकांकडून फी मागायचा संकोच करीत. पण पुढं पुढं उपचार घेणारी मंडळी त्यांना गृहीत धरू लागल्याचे दिसू लागले. फी न देणारे लोक किमान आभार व्यक्त करण्याचेही सौजन्य पाळत नसल्याचे त्यांच्या लक्षात येऊ लागले.

मग अपवाद वगळता त्यांनी फी घेण्याचे ठरवले. पण नेहमी येणाऱ्या एका जोडप्याची बाहेर निघतानाची कुजबुज पूनमने ऐकली, “इथं फी द्यावी लागणारच होती, तर आपल्या घराजवळ डॉक्‍टर होतेच ना! त्यासाठी इथं यायची गरज काय?’ हे वाक्‍य ऐकून पूनमला जबर धक्का बसला …तिने त्यांच्याकडून पहिल्यांदाच फी घेतली होती, आणि त्यात त्यांची अशी कडवट प्रतिक्रिया? खरं तर किती माफक अपेक्षा होत्या त्या डॉक्‍टर पती पत्नीच्या, पण त्यांच्या संबंधांचा फायदा घेणारी मंडळी ती पुरी करण्यासही अपुरी पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्यासाठी कोणी काही करत असेल किंवा आपण कोणाकडून काही करवून घेत असू तर आपले ईप्सित साध्य झाल्यावर त्याला श्रेय देत गोड शब्दांत केलेली वाखाणणी समोरच्या माणसाला सुखावून जाते, अशाने ती व्यक्ती पुढेही लोकांना मदत करण्यास प्रवृत्त राहते. कृतज्ञता, धन्यवाद, आभार, कौतुक हे शब्द थोड्या फार फरकाने पर्यायवाचीच.

थोडं खोलात जाऊन बघा. आपली सभ्यता ही अशाच कृतज्ञतेच्या भावनेवर उन्नत आहे, नाग हा उंदीर घुशीचा फडशा पाडतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचे धान्य शाबूत राहते, याचे आभार म्हणूनच नागपूजन करत नागपंचमी साजरी केली जाते. गायीचे उपकार मानत वसुबारसेला तिची पूजा केली जाते. बैल शेतकऱ्यांसाठी उर फोड मेहनत घेतो. याची जाण म्हणून त्याच्या सन्मानार्थ बैलपोळ्याचे आयोजन केले जाते. दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्रास्त्र, औजारे, मशिन्स इत्यादींचे पूजन करून त्यांनाही एक दिवस विश्राम देत धन्यवाद दिला जातो, तुळशीचे लग्न, वडाचे पूजनही याचेच द्योतक नाही का?

चेतन व जड चराचर सृष्टीचे आभारी राहायला हवे, ही शिकवण आपल्या सर्वांच्या प्राथमिक संस्काराचा भाग आहे. आपण कोणाकडे चार दिवस राहून परतल्यावर फोन किंवा पत्राद्वारे त्याची कृतज्ञता व्यक्त करणे यात सुसंकृतपणा सामावलेला असतो, पण आपण साधं गावी सुखरूप पोचल्याचे कळवणे महत्वाचे समजत नसू, तर यजमान म्हणून त्याला किती वाईट वाटू शकते याचा विचार करायला हवा,

एखाद्याकडून आणलेली वस्तू, रक्कम वेळेवर परत करताना, त्यांचे यथायोग्य आभार मानल्यास, परत अडचणीच्या काळी ती दारं कधी ठोठवावी लागली, तर हसतमुखाने स्वागत होते. सकाळी उठताना “पाद स्पर्श क्षमस्वमे’ या उच्चाराने धरती मातेचे ऋण मानणे हे इतर कोणत्या संस्कृतीत अपवादानेच आढळेल.

दिवसाच्या सुरुवातीला कार चालवण्याआधी तिलाही नमस्कार करून आपल्या संस्कारांचे मोल वाढवले जाते. दुकान उघडताना तसेच बंद करताना कुलुपाला केलेला नमस्कार त्याच्या मागची धन्य भावना दर्शविते.

एखाद्या याचकास भिक्षा देणे शक्‍य नसेल तर क्षमा करा असे म्हणत विनम्र होत हात जोडणे ही आपल्या संस्कारांबद्‌द्‌लच्या कृतज्ञतेचेच निदर्शक असते. एखाद्याच्या कर्तृत्वाचा वयाच्या विशिष्ट टप्प्यावर कौतुक समारंभ तर उतारवयात कृतज्ञता समारोह करत त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा आदर्श इतरांसमोर ठेवला जातो. चांगल्या कामाचे चारचौघात वेळोवेळी केलेल्या कौतुकाने संबंधितांवर मूठभर मांस चढते, आपल्या कार्याची दखल घेतली जात आहे हे कळाल्यावर तो अधिक जोमाने कार्यरत होतो. अन्यथा त्याचा हिरमोड होतो. एवढेच नव्हे, तर परिवारात कोणी मृत्यू पावल्यावर सांत्वनासाठी येणाऱ्यांचेही यथावकाश ऋणनिर्देश करणे योग्य ठरते.

कृतज्ञता हा माणसाला माणसाशी जोडणारा दुवा आहे. आपल्याभोवती जे काही व्यक्त आणि अव्यक्त आहे त्याविषयी कृतज्ञता बाळगणे हा आपला धर्मच जाणावा. प्रत्येकाला कोणी न कोणी मदत, सहकार्य करत असतो, दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी आपल्या नजरेतून सुटून जातात, पण आपण प्राधान्याने अशा व्यक्तींची मुक्तकंठाने प्रशंसा करण्याची सवय लावून घ्यावी, अशाने लोकं आपल्या जवळ येतात. त्यासाठी वेगळा काहीही खर्च करावा लागत नाही, हे ही लक्षात असू द्या, म्हणूनच आभार, कृतज्ञतेचे महत्व जाणा आणि त्याचे पाईक व्हा.

एकदा ब्रम्हदेवाने सद्‌गुणांचे सम्मेलन भरविले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे एकेक सद्‌गुण येऊ लागला. नम्रता आली, तिच्या पाठोपाठ प्रामाणिकपणा आला. धैर्य, वक्तशीरपणा हातात हात घालून आले, निर्भयता, शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा हे ही स्थानापन्न झाले. हजरजबाबी म्हणाला, “सारे आले देवा, आता सभा सुरू करा!’ ब्रम्हदेव म्हणाले, “थांबा, एक सद्‌गुण यायचा बाकी आहे, आणि तो आल्याशिवाय सभा सुरू करता येणार नाही, एवढ्यात चेहऱ्यावर उदात्तभाव असलेली एक कृश, नम्र, पण तेजस्वी व्यक्ति आत आली, ब्रम्हदेव उभे राहिले, म्हणाले, “ती पहा कृतज्ञता आली. आता आपण सुरू करू या, कारण सद्‌गुणांचे सम्मेलन कृतज्ञतेशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. कृतज्ञतेची ही बाराखडी आपण जपल्यास जीवन अधिकच सुंदर आणि सुसह्य होते, हे नक्की!

– सत्येंद्र राठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)