कूल, कूल, सिम्फनी लिमिटेड

उन्हाची काहिली संपता संपत नाही. उकाड्याने आपण इतके हैराण झाले आहोत आणि गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता हा त्रास दिवसेंदिवस वाढतच आहे. घामाच्या धारा आणि उकाड्यापासून बचाव करण्यासाठी ऑफिसेस, मोठमोठे मॉल, दुकाने आणि घराघरातही उपाययोजना कराव्या लागत आहेत. अशावेळी प्रत्येक घरात किंवा दुकान-ऑफिसमध्ये एसी बसवणे शक्‍य नसते. एसी सगळ्यांनाच परवडत नाही. मग सगळ्यात लोकप्रिय उपाय म्हणजे एअरकूलर लावणे. आज एअरकूलर म्हटले की, एकच नाव पुढे येते आणि ते म्हणजे सिम्फनी.

1930 मध्ये अडम गोयेट्टी ह्याने एअरकूलरची पहिल्यांदा निर्मिती केली. सिम्फनी 1939 पासून एअरकूलर बनवत आहे. बाष्पीभवनाद्वारे हवा थंड करणे हे एअरकुलरचे काम आणि एअर कूलर बनवण्यात सिम्फनी जगामध्ये पहिल्या स्थानावर आहे. भारतामध्ये ही कंपनी 5 फेब्रुवारी 1988 मध्ये संस्कृत कम्फर्ट सिस्टिम्स या नावाने सुरु झाली. या कंपनीने सिम्फनी ब्रॅंडच्या एअरकुलरबरोबरच एक्‍झॉस्ट पंखे, रुम हिटर्स आणि घरगुती वापराच्या पिठाच्या चक्क्‌या बनवण्यास सुरवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2001 मध्ये कंपनीचा प्रसिद्ध सुमो एअरकुलर बाजारात आला आणि पाहता पाहता लोकप्रिय झाला. त्यापाठोपाठ आला जम्बो एअरकुलर. 2010 मध्ये कंपनीचे नाव सिम्फनी लिमिटेड झाले. याचवेळी कंपनीने औद्योगिक क्षेत्रालाही एअरकुलरप्रमाणे मोठ्या प्रमाणात वातानुकुलनाचे पर्याय उपलब्ध करून दिले. आज या विस्तारलेल्या क्षेत्रातही कंपनीचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मध्य भारतात व उत्तर भारतात ज्याठिकाणी हवा कोरडी असते आणि कडक उन असते त्याठिकाणी एसीपेक्षा एअरकुलर जास्त उपयुक्त ठरतात. आज अशा ठिकाणी घरे, दुकाने याबरोबरच मोठ्या प्रमाणावर एअर कुलरचा पर्याय सिम्फीनीच्या माध्यमातून मिळाला आहे.

सिम्फनीचा स्टॉर्म हा जगातील सर्वात मोठा एअरकुलर 2012 साली बाजारात आला. यात प्रगत इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा वापर करण्यात आला होता. आता सिम्फनीच्या एअर कुलरची विक्री देशात व परदेशात झपाट्याने वाढत होती. ह्याची नोंद भारत सरकारने घेतली व सिम्फनीला स्टार एक्‍सपोर्ट हाऊसचा पुरस्कार मिळाला.

2013 मध्ये कंपनीने खिडकीत बसवता येतील असे एअरकुलर बनवण्यास सुरवात केली. त्यांचा डायट 22-आय हा कुलर लोकप्रिय झाला. बऱ्याच कंपन्यांनी सिम्फनीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला पण, कुणीही त्यांच्या जवळपास पोचू शकले नाही. आजदेखील सिम्फनीचा बाजारातील वाटा 50 ट्‌क्‍क्‌यांपेक्षा जास्त आहे.
आज घरगुती एअरकुलरमध्ये क्‍लाऊड, सेन्स, स्टॉर्म, टच, डायमंड, सुमो, डायट, सिएस्टा असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. कारखाने व व्यापारी संकुलासाठी कंपनीचे मध्यवर्ती मोठे एअरकुलर्स चीन व अमेरिकेत लोकप्रिय आहेत.

छोटे-मोठे वर्कशॉप, हॉटेल्स, जिम, अशा ठिकाणी लागणारे आणि एका जागेवरून सहजपणे दुसरीकडे नेता येणारे अशा अनेक प्रकारचे कुलर कंपनी बनवते. ते विकत घेण्याआधी ग्राहकांना आवश्‍यक तो सल्ला आणि मार्गदर्शन देण्याचे कामही सिम्फनी करते. आज हे एअरकुलरही स्मार्ट झाले आहेत. ते रिमोट कंट्रोलद्वारे चालतात. या सर्वांच्या विक्रीसाठी कंपनीने ई-मार्केटिंगचा पर्यायही स्वीकारला आहे. या क्षेत्रामध्ये अनेक छोटे-मोठे उत्पादक आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये सिम्फनी आपली आघाडी टिकवून आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या या कंपनीचे 60 देशांमध्ये विक्रीचे काम सुरु आहे. या बरोबरच कंपनीच्या इम्पको-मेक्‍सिको आणि चीनमधील केरूयलाय एअरकुलर या उपकंपन्या आहेत.

भारतात 1000 पेक्षा जास्त वितरक आणि 3000 पेक्षा जास्त किरकोळ विक्रेते या कंपनीच्या वाढीत सहभागी आहेत. भारतभर वेळीअवेळी झालेल्या पावसाने यावर्षीच्या शेवटच्या महिन्यात या कंपनीच्या विक्रीवर थोडा परिणाम झाला. म्हणून या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत थोडी घट अपेक्षित आहे. त्याचा फायदा घेऊन शेअर खरेदी करून दीर्घमुदतीसाठी कूल राहू या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)