अरविंद वाघ : इंदापुरात उच्च स्तरावरील स्पर्धा आयोजनाची संधी द्या
रेडा- इंदापूर तालुका हा लाल मातीशी इनाम राखणारा तालुका म्हणून जिल्ह्यात नव्हे राज्यात नावलौकिक मिळवून आहे. कुस्ती हा ताकदीचा व युक्तीचा खेळ आहे. या दोन गोष्टींची सांगड ज्यांना यशस्वी करता आली. ते मल्ल जीवनात यशस्वी होतात, असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी केले. इंदापूर तालुका क्रीडा कार्यालय व पैलवान रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळ यांच्या वतीने आयोजित तालुकास्तर शालेय दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, इंदापूर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष मारुती मारकड, नगर परिषदेच्या नगरसेविका मधुरा ढवळे, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन अशोक चोरमले, विजया मारकड, महेंद्र राऊत,शरद झोळ मान्यवर उपस्थित होते.
वाघ म्हणाले की, शासन स्तरावरून व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम इंदापूर तालुक्यांमध्ये उभे राहत आहे. त्यामुळे आगामी काळात राधिका माध्यमिक विद्यालयाकडे शासनाच्या उच्च स्तरावरील स्पर्धा आयोजनाची संधी मिळाली तर यशस्वीरित्या पार पाडू, अशी ग्वाही माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी दिली. अनेक उपेक्षित रुग्णांना अद्ययावत ऍम्बुलन्स सेवा राधिका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पुरवून सामाजिक भान राखले जात आहे. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी मार्गदर्शन केले. इंदापूर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान मारुती मारकड यांनी स्वागत केले. तालुका क्रीडा अधिकारी व्हनमाने यांनी आभार मानले.