कुस्करलेली फुलं व बालमनाची कबुली

अरुण गोखले 

इतका वेळ झाला तरी अजून मिनू इतकी शांत कशी? ती करतीय तरी काय? हे पाहायला आई खोलीत आली, आणि तिने पाहिले तर काय! मिनू मस्तपैकी आजीने देवपूजेसाठी आणलेली फुलं कुस्करत बसली होती. तिने फुलांच्या पाकळ्या-पाकळ्या अलग केल्या होत्या. आईने रागाने विचारले, “मिनू अगं… तू हे काय करते आहेस? किती छान सुंदर फुलं होती ती. मिनू! आजीने देवाला वाहायला आणली होती ती बागेतून! तू ती फुलं कुस्करलीस, तोडलीस, त्याच्या पाकळ्या करून टाकल्यास, सांग ना, का केलंस तू? थांब तुला तसं सांगून भागणार नाही…’ असं म्हणत आईने मिनूचे गाल कुस्करले. ती कळवळली, तिच्या डोळ्यात पाणी आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आई नको ना गं…’ मिनू रडत रडत आईला म्हणत होती.
तोच आजी तिथं आली. तिनं समोरचं दृष्य पाहिलं आणि काय झालंय ते तिच्या लक्षात आलं. ती कामगिरी कुणाची, हे पण तिच्या लक्षात आले. आईने त्यासाठी रागारागाने मिनूचे कुस्करलेले गालही तिने पाहिले.
क्षणभर स्वत:च्या मनातल्या रागालाही संयमाने आवर घातला. रडवेल्या मिनूला जवळ घेत आजी तिला म्हणाली, “मिनू , अगं आईने तुझे गाल हळूवारपणे कुस्करले तरी तुझ्या डोळ्याला पाणी आले, होय ना? मग तू तर या नाजूक सुंदर फुलांच्या पाकळ्या तोडल्यास. किती दुखलं असेल त्या फुलांना, तू एक एक पाकळी तोडताना? बाळा! अरे अशी फुलं कुस्करायची नसतात. त्यांच्या पाकळ्या तोडायच्या नसतात.आणि मिनू आणखी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का गं?

“कोणती ग आजी?’ मिनूने विचारले.
तेव्हा तिचे लक्ष तिच्या रंगलेल्या हातांकडे वेधून घेत आजी म्हणाली, “मिनू! तू तुझे हात पाहिलेस का? अग ज्या हातांनी तू ती फुलं कुस्करलीस, त्या फुलांनी तुझे तेच हात किती छान रंगवले आहेत. बरं नुसते ते रंगवले नाहीत तर… त्यांनी तुझ्या हाताला छानसा वासही दिलाय. घे बरं तुझे हात नाकाशी आणि वास घेऊन बघ.’
मिनूने ती कृती केली. खरंच तिच्या रंगलेल्या हातांना वासही येत होता. आणि दुसऱ्याच क्षणी त्या बालमनाने एक कबुली दिली…
“आजी! मी चुकले, मी पुन्हा कधी फुलं कुस्करणार नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)