कुराशमध्ये भारताला रौप्यपदकासह दोन पदके 

जकार्ता: आशियाई क्रीडास्पर्धेचे एक वैशिष्ट्य असलेल्या कुराश प्रकारांत भारतीय महिलांनी एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई करताना भारताच्या खात्यात मोलाची भर घातली. महिलांच्या 52 किलो गटांत भारताच्या पिंकी बलहाराला अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या गुलनोर सुलेमानोव्हाकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी याच गटातील उपान्त्य फेरीत गुलनोर सुलेमानोव्हाकडूनच पराभूत झाल्यामुळे भारताच्या मलप्रभा जाधवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सोनिया, पवित्रा यांची झुंज अपयशी 
आशियाई आणि जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकणारी सोनिया लाथर आणि पवित्रा या भारतीय महिला खेळाडूंचे महिलांच्या मुष्टियुद्धातील आव्हान कडव्या झुंजीनंतर उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे भारतीय मुष्टियोद्‌ध्यांसाठी आशियाई क्रीडास्पर्धेतील आजचा दिवस निराशाजनक ठरला.
महिलांच्या 57 किलो (फेदरवेट) गटांत सानिया लाथरला उत्तर कोरियाच्या जो सोन हवाविरुद्धच्या उपान्त्यपूर्व लढतीत कधीच वर्चस्व गाजविता आले नाही. सामन्यातील बहुतेक वेळा जोनेच आक्रमण केले व सोनियाने बचावात्मक धोरण अवलंबले. त्याचा फटका सोनियाला बसला. त्यानंतर सुमारे पाऊण तासाने रिंगणात उतरलेल्या पवित्राने मात्र महिलांच्या 60 किलो (लाईटवेट) गटांत घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर खेळणाऱ्या हसवातुन हसनाहला कडवी झुंज दिली. किंबहुना पहिल्या फेरीत पवित्राने वर्चस्व गाजविले. परंतु दुसऱ्या फेरीपासून हसनाहने आपल्या डावपेचांमध्ये बदल करताना पवित्राला नामोहरम केले.
व्हॉलीबॉलमध्ये पराभव 
पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला पाकिस्तानविरुद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला. 7 त 12 क्रमांकांमधील क्‍लासिफिकेशनसाठी ही लढत होती. भारतीय संघाने पहिला सेट 25-21 असा जिंकून जोरदार सुरुवात केली. परंतु पाकिस्तानने पुढचे दोन्ही सेट 25-21 असे जिंकताना आघाडी घेतली. तसेच भारतीय संघाने कडवी झुंज दिल्यावरही पाकिस्तानने चौथा सेट 25-23 असा जिंकून बाजी मारली. भारतीय महिला संघाचे पदकाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे हा संघही 7 ते 12 क्रमांकासाठी क्‍लासिफिकेशन लढतीत खेळणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)