कुरकुंभ येथील आगीचे कारण अस्पष्टच

अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनी पेटल्यानंतर लहान मुले, महिलांचे हाल

कुरकुंभ- कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमधील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमधील स्टोरेज गोडाऊनला आग लागल्याची घटना बुधवारी (दि. 14) रात्री 10च्या दरम्यान घडली आहे. अद्यापही आगीचे कारण समजू शकले नसले तरी या आगीचे लोट पाहून कुरकुंभ परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान तब्बल 400 ते 500 मेट्रिक टन एवढे केमिकल जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे; मात्र कंपनीने जळलेली केमिकल काय होती व उत्पादन काय आहे, हे मात्र सांगितले नाही. कंपनीतील आगीची तीव्रता एवढी भयानक होती की, रात्रीच्या वेळी आकाशात दूरवर आगीचे लोटचे लोट दिसत होते. कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्कली अमाईन्स या कंपनीच्या आतील बाजूस स्टोरेज गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये विविध रसायनांचे, केमिकलचे ड्रम (बॅरल) ठेवण्यात आले होते. या बॅरलला अचानक आग लागल्याने या आगीने रुद्ररुप धारण केले. साधारण अडीचशे ते तीनशे ड्रम या स्टोरेज गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते.

आग लागल्याने काही क्षणात हे ड्रम हवेत उडून एकामागे एक अशी स्फोटांची मालिका तब्बल दोन ते अडीच तास सुरू होती. त्यामुळे एमआयडीसी परिसरात आगीचे लाल रंगाचे लोटचे लोट दिसत होते. परिसरातील काही कामगार सेकंड शिपला कामावर जात असतानाच एमआयडीसीमध्ये आग लागल्याचे पाहताच त्याने परतीचा प्रवास स्वीकारला; मात्र आगीच्या वेळी इतर दुसऱ्या कंपन्यामध्ये असलेले कामगार आगीचे लोट पाहून घाबरून गेल्याचे पाहायला मिळाले.

आगीने रौद्ररुप धारण केल्याने आकाशात आगीचे लोळचे लोळ दिसत होते, यावेळी कुरकुंभ अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचा पर्यंत करत होते, या पाठोपाठ पुणे महानगरपालिका तसेच दौंडमधून आणि इतर दोन अग्निशमन बंबाच्या गाड्या दाखल होऊन त्यांनी आग आटोक्‍यात आणून पुढील मोठा अनर्थ टाळला, कुरकुंभ अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी पार पाडलेल्या जबाबदारीचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने कंपनीला लागलेली आग ही घातक आहे, अशी सर्वत्र अफवा पसरल्याने कुरकुंभ, तसेच एमआयडीसी परिसरातील नागरिकांनी घर सोडून आपल्या घरातील सर्व सदस्यांसोबत सुरक्षित ठिकाणी जाऊन आश्रय घेण्यास सुरवात केली होती. भीतीपोटी कुरकुंभशेजारील मळद, जिरेगाव, रोटी, वासुंदे, पाटस येथील अनेक नागरिकांनी सुरक्षा ठिकाणी धाव घेतल्याची चर्चा सुरू होती.

  • वरिष्ठांनी घेतली दखल
    कुरकुंभ एमआयडीसीमधील आगीने भयभीत झालेले एमआयडीसी परिसरातील तसेच आजू-बाजूच्या 10 किमीपर्यंत लोकांनी परिसर रिकामा करण्यास सुरुवात केल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी रात्री अडीच वाजता भेट दिली तर सकाळी अकराच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे दौंड तालुका राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार तदनंतर माजी आमदार रमेश थोरात यांनी भेटी दिल्या. कुल यांनी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावत स्वतः रात्रीच्या वेळी घटनास्थळी भेट दिली. अफवांवर विश्‍वास न ठेवता कोणी ही परिसर सोडू नये, असे आवाहन केले. दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनीदेखील कंपनीतील आगीपासून जीवितास कोणताही धोका नसून गाव न सोडण्याच्या ग्रामस्थांना सूचना देत होते.
  • रिअल हिरो… अर्थात देवदूत
    काल रात्री कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत लागलेली भयानक आग विझवण्यासाठी प्राणाची पर्वा न करता अथक प्रयत्न करणारे अग्निशामक दलाचे अधिकारी सुधीर खांडेकर आणि त्यांच्या टीममुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. एवढा मोठा अपघात होऊनही कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देऊन प्रशासनाने स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला होता. अपघाताचे गांभीर्य विचारात घेता संबंधित कंपनी बंद राहणे गरजेचे होते; परंतु संबंधित कंपनीचे उत्पादन नेहमीप्रमाणे सुरू होते, यामुळे कंपनीला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)