कुरकुंभ “एमआयडीसी’ महिनाभरापासून अंधारात

पथदिव्यांच्या कामात केबल तुटल्याने परिसरात लाईट नाही

कुरकुंभ- येथील औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, नवीन पथदिवे बसविण्यासाठीच्या कामाला मंजुरी मिळून काही ठिकाणी कामाला सरुवातही झाली आहे, मात्र ज्या ठिकाणी नवीन पथदिवे बसविण्यात येणार आहेत त्या ठिकाणी रस्त्याच्या दुभाजकामध्ये भले मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत आणि हे खड्डे खोदताना बऱ्याच ठिकाणची केबल तुटल्याने एमआयडीसीचा पथदिव्यांना असणारा विद्युत पुरवठाच बंद असल्याने रात्रीच्या वेळी कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी एक महिन्यापासून पूर्णपणे अंधारात आहे. याबाबत कुरकुंभ औद्योगिक विकास महामंडळ आणि संबधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिक आणि कामगार करीत आहे.

कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. काही ठिकाणी जुने खराब झालेले पथदिवे तशाच अवस्थेत उभे आहेत. रस्त्याच्या दुभाजकाच्या ठिकाणी नवीन पथदिवे बसविण्याचे काम हाती जरी घेतले असले तरी एक महिना उलटून गेला तरी नवीन पथदिवे बसवले नाहीत, उलट खड्डे खोदताना केबल तुटल्याने एमआयडीसीच अंधारमय झाली आहे. रस्त्याच्या दुभाजकामध्ये भले मोठे खड्डे खोदल्याने काही माती रस्त्यावरही आली आहे, त्यामध्ये छोटे छोटे दगड रस्त्यावर आले आहेत. या अंधाऱ्या रस्त्यावरून कामगार घरी जाताना रस्त्यावर आलेल्या माती आणि दगडांवरून दुचाकी घसरण्याची घटना घडल्या आहेत.

मागील आठवड्यात औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीमध्ये रात्रीच्या दहाच्या सुमारासच चोरीचा प्रयत्न झाला होता. एमआयडीसी परिसरच अंधारमय झाल्याने अशा घटना घडण्याची आणि वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या ठिकाणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिक परिसर असल्याने या ठिकाणी तीन पाळ्यांमध्ये काम होत असते. दुपारच्या पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे पगार झाले तर रात्री कामावरून घरी जाताना अंधाराचा फायदा घेत चोरीच्या आणि लुटमारीच्या घटना घडण्याची भीती कामगारांमध्ये आहे, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकणी नवीन पथदिवे बसविणे नितांत गरजेचे बनले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.