कुडाळला राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता मेळावा

विविध विकासकामांचे : भूमीपुजन अन्‌ उद्‌घाटन

कुडाळ- आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून म्हसवे जिल्हा परिषद गटातील विविध गावांत विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या कामांचे भूमीपूजन तसेच पूर्ण झालेल्या विकासकामांची उद्‌घाटने अशा संयुक्तीक कार्यक्रमाचे रविवार, 23 रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ, ता. जावली येथील जय दत्तगुरू मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत झाले गेले विसरून सर्वांनी एकत्रितपणे येऊन पक्षाचे काम करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र तरीही लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने मोठे मताधिक्‍य घेतले होते. त्यामुळे निकालानंतर तालुक्‍यात अनेक राजकीय उलथापालथही झाली.

लोकसभेच्या निकालानंतर तालुक्‍यात पहिलाच राष्ट्रवादीचा मेळावा होत असून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या राजकीय वाटचालीविषयी गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू असल्याने या मेळाव्याकडे तालुक्‍यातील जनतेचे विशेष लक्ष लागलेले आहे. आमदार भोसले यांनीही आगामी दिशा ठरवण्यासाठी योग्य भूमिका घ्यावी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या मेळाव्यासाठी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य, जावळी बॅंक, बाजार समितीचे पदाधिकारी तसेच विवध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)