कुठे नेऊन ठेवलयं पुणे माझे

दिलीप बराटे यांची भाजपवर टीका


शुक्रवारी भाजपला सत्तास्थापनेस 2 वर्षे पूर्ण


पूर्वसंध्येला बराटे यांनी पत्रकार परिषद

पुणे – महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गेल्या दोन वर्षांत पुणेकरांना केवळ आश्‍वासने दिली असून त्यातील एकाही आश्‍वासनाची पूर्तता करण्यात भाजपला यश आलेले नाही. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे. त्यामुळे “कुठे नेऊन ठेवलयं पुणे माझे’ हे म्हण्याची वेळ पुणेकरांवर आली असल्याची टीका महापालिकेचे विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांनी केली आहे. महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सत्तास्थापनेस शुक्रवारी 2 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला बराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आहे.

बराटे म्हणाले, शहरात भाजपचे 97 नगरसेवक, आठ आमदार तसेच एक खासदार आहे. तर गेल्या दोन वर्षांत भाजपला तीनवेळा अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळाली. मात्र, या तीनही अंदाजपत्रकात भाजपने केवळ घोषणांच केल्या असून त्यातील काही योजना भाजपला मार्गी लावता आलेल्या नाहीत. तर ज्या प्रकल्पांचे उद्‌घाटन अथवा काम सुरू झाले आहे. ते आघाडीच्या काळातील आहे. भाजपने केवळ सत्ता आहे म्हणून ती पूर्ण केली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत भाजपला शहरातील वाहतूक, कचरा, पाणी समस्या सोडविण्यात अपयश आले आहे. नदीसुधारणेचा जायका प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भाजपला पूर्ण करता आलेला नाही. त्याचा फटका पुणेकरांना बसला असून पुणेकरांवर धरणात पाणी असतानाही पाणी कपातीचा समाना करावा लागला असून केवळ सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे महापालिकेचे स्वच्छ शहराचे मानांकनही घसरले असल्याची टीकाही बराटे यांनी यावेळी केली. तर वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, नदीकाठ विकसन, बालगंधर्व रंगमंदीराचा पुनर्विकास तसेच ई-लर्निंगसारखे प्रकल्प केवळ सत्ताधारी भाजपच्या नाकर्तेपणामुळे कागदावरच असल्याची टीकाही बराटे यांनी यावेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.