कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणात मासेमरी बंद करा

रोहिदास भोंडवे ः कुकडी पाटबंधारे विभागाकडे केली मागणी

नारायणगाव- कुकडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगावजोगा,चिल्हेवाडी धरणातील मृत साठ्यातील मासेमारी बंद करण्याची मागणी भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रोहिदास भोंडवे यांनी निवेदनाद्वारे कुकडी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

भोंडवे यांनी निवेदनाद्वारे नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगावजोगा, चिल्हेवाडी धरणात परप्रांतीय ठेकेदार मच्छिमारी करीत आहेत. स्थानिक आदिवासी बांधवांचा हक्क असताना त्यांना परप्रांतीय मच्छिमारी करून देत नाहीत, तसेच मृत साठ्यात मच्छिमारी केल्याने पाण्याचे प्रदूषण होऊन आदिवासी बांधवाना दूषित पाणी प्यावे लागत आहे. येथील मच्छिमार जाळे टाकल्यानंतर पकडलेल्या माशांमधून लहान मासे धरणाच्या कडेला फेकून देतात, त्यामुळे ते मृत मासे पाण्यात पडल्याने पाणी दूषित होते. पाण्याचा वास येत आहे. याबरोबरच धरणातील माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या दूषित पाण्याने रोगराईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर कारणांमुळे कुकडी पाटबंधारे विभागाने मच्छिमारी बंद करावी, अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करावे लागेल, अशा इशारा भोंडवे यांनी दिला आहे. हे निवेदन पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता घळगे यांच्याकडे दिले आहे. यावेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष नामदेव अण्णा खैरे, युवराज मुंढे, संतोष परदेशी, तानाजी थोरवे, किसान उठले, राबजी कुठे आदी उपस्थित होते .

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×