कुकडीला पाणी; 50 गावांचा पाणीप्रश्‍न मिटला

शिरूर, पारनेर तालुक्‍यातील नागरिक समाधानी : जगप्रसिद्ध रांजणखळगे खळखळले

टाकळी हाजी- कुकडी नदीला पाणी सोडल्यामुळे टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे खळखळु लागले असून हे नयनरम्य दृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढु लागली आहे. तर कुकडी नदीला पाणी सोडल्याने तसेच शिरूर व पारनेर तालुक्‍यातील सुमारे 50 गावांतील नळपाणी पुरवठा योजना सुरू होण्यास मदत होणार आहे.

जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) परिसर गेली पाच महिन्यांपासून कोरडेठाक पडले होले; मात्र बुधवारी (दि. 31 जुलै) सकाळी मोठ्या प्रमाणात कुकडी नदीचे पाणी रांजणखळग्यात आले ते खळाळून वाहू लागले असून हे पाणी पहाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरण 90 टक्‍के भरले असून या धरणातील पाणी पाच हजार क्‍युसेकने कुकडी नदीला तसेच 1300 क्‍युसेकने डावा कुकडी कालव्याला सोडण्यात आले आहे.

मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात पाण्याचा साठा फक्‍त 58 टक्‍के होता. सध्या कुकडी प्रकल्पाअंतर्गत परिसरात गेली चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. निघोज (ता. पारनेर) व टाकळीहाजी (ता. शिरूर) या भागातील गावांना फेब्रुवारी पासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत होता. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत कडक उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई मोठ्याप्रमाणात जाणवू लागली. अनेक गावात टॅंकर सुरू होते; मात्र कुकडी डावा कालवा तसेच कुकडी नदीला पाणी सोडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने या भागातील लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला असे असूनही कुकडी अधिकाऱ्यांनी या भागात पुरेसे पाणी सोडण्यास असमर्थता दाखवल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला तिष्ठत राहावे लागले होते.

जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) यामध्ये सातत्याने पाणी असते यावर्षी भिषण पाणीटंचाई, कडक उन्हाळा व कुकडी अधिकाऱ्यांच्या चुकीचे धोरण यामुळे कुंडात पाण्याचे प्रमाण शुन्य टक्‍के होते. एप्रिल महिन्यात देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी राज्यातून पाच ते सहा लाख भाविक येत असतात मात्र, यासाठीसुद्धा कुकडीच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यास नकार दिला. हा प्रकार गेल्या 20 ते 25 वर्षांत पहिल्यांदाच झाला असल्याने भाविक व ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्‍त केली होती.

  • कुकडी नदीला मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने या भागातील जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. तसेच अनेक गावातील नळपाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे.
    – राजेंद्र गावडे, संचालक, घोडगंगा कारखाना

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.