“कि-ऑस’मुळे महसुलात वाढ

पिंपरी – पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातून कि-ऑस (अभिलेख) मशीनमुळे महिन्याकाठी सुमारे नव्वद हजार रूपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. तसेच सात बारा आणि फेरफार कागदपत्रे एका “क्‍लिक’वर पहायला मिळत असल्याने नागरिकांचे तहसील कार्यालयात फेऱ्या मारण्याचे दिवस संपले आहेत.

अप्पर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अंकूश आठवले यांनी याबाबत माहिती दिली. “सेतू’मध्ये ठेवण्यात आलेल्या “कि-ऑस मशीन’मुळे सात बारा आणि फेरफारची कागदपत्रे नागरिकांना एका “क्‍लिक’वर पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढला असून महिन्याकाठी नव्वद हजार रुपयांचे उत्पन्न त्याद्वारे मिळते. एक जून 2018 पासून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. आत्तापर्यंत सात बारा आणि फेरफार काढण्यासाठी सप्टेंबरपर्यंत 650 अर्ज आले असून त्यापैकी 600 जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. याची प्रक्रिया सोपी असून नागरिकांना काही वेळातच कागदपत्रे मशीनच्या सहाय्याने पाहता येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सात बारासाठी अर्ज केल्यानंतर लगेच संबंधितांना टोकन मिळते. त्यानंतर कागदपत्रे तपासण्यासाठी टोकन क्रमांकासहीत नाव, गाव, गट किंवा सर्व्हे क्रमांक टाकल्यास सात बारा मशीनवर पहायला मिळत आहे. सात बारा आणि फेरफारची प्रमाणित नकल हवी असल्यास त्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागत असल्याची माहिती संगणक ऑपरेटर निखिल शेगोकार यांनी दिली. तसेच कागदपत्रांच्या प्रतीची संख्या कमी असल्यास नागरिकांना तातडीने सात बारा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. सात बारा आणि फेरफारच्या काही जणांची प्रतीची संख्या जास्त असल्याने प्रती यायला वेळ लागतो. तरी सध्या गर्दी नसल्याने येणाऱ्या सर्व नागरिकांना वेळेत कागदपत्रे देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सात बारा आणि फेरफारचे 1930 ते 2010 पर्यंतची कागदपत्रे “स्कॅन’ केलेली आहेत. तसेच 2010 ते 2015 पर्यंतची नोंदणी तलाठी कार्यालयात असून त्याचे “स्कॅनिंग’ करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील नागरिकांना कागदपत्रे कि-ऑस मशीनवर पहायला मिळणार आहेत.

“कि-ऑस मशीन’मुळे हेलपाटे वाचत असून वेळेत सात बारा आणि फेरफार मिळत आहे. आधी नोंदी काढायला वेळ लागायचा. त्यासाठी 15 ते 20 दिवस लागायचे. मात्र, आता अर्ज केल्यावर लगेच टोकन मिळत असून कागदपत्रे पहायला मिळत आहे. प्रमाणित नकलसुद्धा ठरलेल्या दिवशी मिळत आहे.
– अल्ताफ शेख, नागरिक.

“कि-ऑस मशीन’ची माहिती नागरिकांपर्यंत पोहचली आहे, त्यामुळे त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. वेळेत सगळी कागदपत्रे त्यांना मिळत असल्याने त्यांची कोणतीच तक्रार अजुनपर्यंत आली नाही. अर्ज आल्यानंतर लवकरात लवकर कागदपत्रे देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. येत्या काही दिवसांत महसूल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
– अंकुश आठवले, अव्वल कारकून, पिंपरी तहसील कार्यालय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)