किसन वीरला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर गतिमान करणार

मदन भोसले यांचा विश्‍वास:वार्षिक सभा खेळीमेळीत
भुईंज, दि. 27 (वार्ताहर) – माझ्या राजकीय आयुष्याचे काय होणार? याची काळजी न करता बावन्न हजार सभासदांच्या हिताशी निगडीत असलेल्या किसन वीर कारखान्याचा गेली 15 वर्ष विचार केला. हे करत असताना स्वत:ला गाडून घेवूनच काम केलं. हे काम दृष्य स्वरुपात दिसणारं असून केवळ कागदावर नाचणारं नाही. सर्व सभासद, कामगारांच्या पाठबळावरच हे काम झालं आहे. त्यांनी खंबीरपणासोबत जबरदस्त अशी साथ दिली त्याचे ऋण कदापि फिटणार नाही. यावर्षीच्या गळीत हंगामात सोळा लाख टन उसाचे गाळप करुन किसन वीरला पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर गतिमान करणारच, असा ठाम विश्‍वास किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्‍त केला.
किसनवीरनगर, ता. वाई येथे कारखान्याची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन भोसले बोलत होते. ते पुढे म्हणाले, किसन वीर कारखान्याने उभारलेले प्रकल्प, प्रतापगड वाचवण्याची घेतलेली भूमिका, खंडाळा उभारण्याचा घेतलेला निर्णय या सर्वात मोठी भांडवली गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक करताना सभासदांच्या उस बिलातून एक रुपयाही कपात केला नाही. त्यातच विशेषत: गेल्या दोन वर्षांत साखर आणि उपपदार्थांच्या दराची फरपट यामुळे काही अडचणी आल्या. मात्र त्या अडचणीतून बाहेर पडण्यात यश येत आहे. शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळणारच नाही, अशा अविर्भावात होते त्यांना शेतकऱ्यांची काळजी नव्हती तर शेतकऱ्यांना पैसे मिळूच नयेत अशी भावना होती. एफआरपी लागू झाल्यानंतर एफआरपीपेक्षा सुमारे सव्वातीनशे कोटी रुपये अधिक शेतकऱ्यांना दिले आहेत, हे वास्तव कोणी कसे पुसून टाकेल? शेतकऱ्यांच्या हिताशी निगडीत कारभार करण्यात कधीच कोणती कसूर केली नाही. हेतू प्रामाणिक होता, आहे आणि यापुढेही राहणार. माझी भावना स्वच्छ आहे. याच भावनेतून काम करताना माझ्या स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष करुन किसनवीरचा संसार कसा बहरेल याची काळजी केली. अडचणीतून जावे लागेल हे खरे, पण यातील अनेक अडचणी ह्या जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या मानवनिर्मित अडचणी देखिल होत्या. कारखान्यावर जप्ती यावी यासाठी प्रयत्न केले गेले. ही संस्था माझ्या एकटयाच्या मालकीची नाही, ती हजारो सभासदांच्या मालकीची आहे याची जाणीव ठेवणे आवश्‍यक आहे.

गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारने इथेनॉल, साखर निर्यातीबाबत जाहीर केलेले निर्णय त्यासाठी शुभशकून ठरणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, व्हिएसआय, साखर संघ, इस्मा यांनी एकत्र येत केलेला पाठपुरावा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह, मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी त्या निर्णयांमध्ये बजावलेली भूमिका त्याबद्दल भोसले यांनी आनंदही व्यक्‍त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपाध्यक्ष गजानन बाबर म्हणाले, सभासदांच्या मालकीच्या संस्थेबाबत कटकारस्थानं रचताना, संस्था बंद पडली पाहिजे यासाठी प्रयत्न करताना त्यासाठी विविध ठिकाणी दबावाचे कुटील राजकारण करताना संबंधितांना लाज वाटली पाहिजे. एवढ्या मोठ्या अडचणीच्या काळातून बाहेर पडताना सभासदांनी संचालक मंडळाच्याच पाठिशी ठाम राहण्याची भूमिका घेतली यावरुन तरी संबंधितांनी धडा घ्यावा. दरम्यान, विरोधकांचे नाव पण घेवू नका, त्यांची चाराची संख्या चारच होती, आहे आणि राहणारे त्यांना अजिबात महत्व देवू नका, खरा पुळका असता तर सभेत सहभागी झाले असते, असे सांगत सभासदांनी बाबर यांना विरोधकांचे नावही घेवू नये, अशी विनंती केली.
यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. दुखवट्याचा ठराव संचालिका विजया साबळे यांनी मांडला. स्वागत संचालक नंदकुमार निकम यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन सचिव एन. एन. काळोखे यांनी केले. यावेळी खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रविण जगताप, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, आशा फाळके, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, मोहनराव भोसले, केतनदादा भोसले, यशराज भोसले, पार्थ पोळके, ऍड. धनंजय चव्हाण, प्रल्हादराव चव्हाण, सतीश भोसले, शेखर भोसले-पाटील, माजी संचालक नंदाभाऊ जाधव, रोहिदास पिसाळ, केशवराव पाडळे, शिवाजीराव गायकवाड, पोपटराव निकम, संदिप पोळ, प्रताप देशमुख, धनाजी डेरे, डॉ. दत्तात्रय फाळके, प्रभाकर साबळे, दिपक ननावरे, सतीश वैराट, कुमार बाबर, अनिरूद्ध गाढवे, बाबा खुडे, राजेंद्र कदम, हरिभाऊ धुमाळ, विश्‍वास पाडळे, मेघराज भोईटे, सभासद शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)