किल्ले शिवनेरीवर मद्य प्राशन करून मजुरांचे गैरवर्तन

जुन्नर-शिवजन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथे मजुरांनी मद्यप्राशन करून गैरवर्तन केल्याची घटना रविवारी (दि. 27) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने शिवप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, किल्ले शिवनेरीवर पुरातत्त्व विभागाच्या वतीने सध्या काम सुरू आहे. या कामासाठी कर्नाटकमधून मजूर आलेले आहेत. या मजुरांनी रविवारी रात्री शिवनेरीवरील शिवाईदेवी मंदिर परिसरात मद्यप्राशन करून गैरवर्तन करीत असल्याचे काही शिवप्रेमींना आढळून आल्यानंतर त्यांना जुन्नर पोलिसांच्या हवाली केले. यामध्ये तिमय्या इंगळे, गुंडाप्पा धोत्रे, यल्लाप्पा माशाळ (सर्वजण रा. गुलबर्गा कर्नाटक) या मजुरांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजीमहाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या शिवप्रेमींना हे मजूर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. जुन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस हवालदार अमोल चासकर, नदीम तडवी, वाहतूक कर्मचारी सुधीर माळी हे घटनास्थळी दाखल झाले. या मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यामध्ये दारूचे सेवन केल्याचे निदर्शनास आले. या मजुरांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काही महिन्यांपूर्वी शिवजयंतीच्या काळावधीदरम्यान वनविभागाचे काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे देखील शिवप्रेमींनी पकडले होते. तसेच किल्ल्यावर पर्यटकदेखील दारू सेवन करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)